Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Sangli › शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापुरातच व्हावे : आमदार बाबर 

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापुरातच व्हावे : आमदार बाबर 

Published On: Apr 18 2018 4:52PM | Last Updated: Apr 18 2018 4:52PMविटा : प्रतिनिधी    

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी आपण कुलगुरू, शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदन दिले असल्याची माहिती आमदार अनिलराव बाबर यांनी दिली आहे. 

आमदार बाबर म्हणाले, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सोलापूरप्रमाणे सांगलीतही पहिल्या टप्यात उपकेंद्र आणि नंतर थेट विद्यापीठच निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी किमान शंभर एकर जागेची गरज आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यातच शिवाजी विद्यापीठाचे  कुलगुरू देवानंद शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकार्‍यांची सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी लवकरात लवकर जागा निश्चित करण्याचे ठरले आहे. या उपकेंद्रासाठी किमान १०० एकर जागा , रस्ते आणि पाण्याची चांगली सोय असावी असे सर्वसाधारण निकष आहेत. दरम्यान  मागे २०१३ -१४ साली सांगली जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या साठी प्राध्यापक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. त्यावेळीच  सांगली जिल्ह्यातील खानापूरच्या लोकांनी तिथे उपकेंद्र व्हावे अशी मागणी कुलगुरूंकडे केली होती.  आज रोजी एकदम ११० एकर जागा  खानापूरात उपलब्ध आहे. शिवाय तिथे हवेशीर मोकळे वातावरण आहे, हे ठिकाण गुहागर - विजापूर या नवीन राष्ट्रीय महामार्गावरचे आहे. टेंभू योजनेच्या पाण्यामुळे मुबलक पाण्याचीही सोय आहे. परिणामी खानापूर हे ठिकाण उपकेंद्र करण्यासाठी अतिशय योग्य आहे असे सांगत आपण मुख्यमंत्री , शिक्षण मंत्री , कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे आमची मागणी निवेदन रूपात पाठवली असल्याचे बाबर यांनी नमूद केले.    

दरम्यान, येत्या पंधरा दिवसात विद्यापीठ प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून संबंधित या जागेची पाहणी केल्यानंतर त्याचा अंतिम प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाणार आहे.