Wed, Nov 21, 2018 21:29



होमपेज › Sangli › विटा पोलिसांकडून १५ घरफोड्यांचा तपास

विटा पोलिसांकडून १५ घरफोड्यांचा तपास

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 10:31PM



विटा :  प्रतिनिधी 

विटा पोलिसांनी 15 घरफोड्यांचा तपास केला आहे.  यात विटा शहरासह  मिरज आणि कडेगाव तालुक्यांतील  घरफोड्या आणि चोर्‍यांचा समावेश आहे. तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर दि. 23 फेब्रुवारीला सांगलीतील  कार्यक्रमात किंमती मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे. ही  माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, या घरफोडी आणि चोरी प्रकरणी सदाशिव गुंडा पाटील (वय 44 रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव, सध्या रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) आणि त्याचा साथीदार सुनील विठ्ठल तडसरे (वय 36, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. 

त्यांच्याकडून दोन कार, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, सोफा आणि इतर गृहोपयोगी वस्तू तसेच कृषी औषधे आणि कीटक नाशके असा एकूण तब्बल 13 लाख 92 हजार 798 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विटा हद्दीतील 13,  कडेगाव हद्दीतील 1 आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या तपास कामात पोलिस उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर,  निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. कांबळे, हवालदार व्ही. पी. यादव  आणि सायबर क्राईम विभागाचे सी. पी. गुंडेवार यांचा सहभाग होता.

शर्मा म्हणाले, गुन्ह्यांतील चोरीला गेलेली चीजवस्तू  संबंधितांना परत  देण्याचा आमचा प्रयत्न आहे.