Sat, Mar 23, 2019 02:42होमपेज › Sangli › अट्टल चोरट्यास माय लेकरांनी धाडसाने पकडले 

अट्टल चोरट्यास माय लेकरांनी धाडसाने पकडले 

Published On: Jul 20 2018 6:43PM | Last Updated: Jul 20 2018 6:43PMविटा : प्रतिनिधी 

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वॉन्टेड असणाऱ्या लखन कृष्णत माने (रा. वणदूर , ता.कागल, जि. कोल्हापूर) या चोरट्यास विट्यातील सुनिता मिलिंद कोरे आणि त्यांच्या विराज व सुमित या दोन मुलांनी अत्यंत शिताफीने पकडले. यावेळी  माने याने केलेल्या मारहाणीत कोरे व त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत, ही घटना शुक्रवारी पहाटे २  वाजता  घडली, या धाडसाबद्दल कोरे माय लेकरांचे कौतुक होत आहे. विटा पोलिसांनी माने यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लखन माने हा चोरी व घरफोडीच्या अनेक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार होता. निपाणी ( कर्नाटक) येथील २०१५ साली घडलेल्या ८० हजाराच्या चोरीप्रकरणी त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती, निपाणी कोर्टात यासंबंधी तारखा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी त्याला निपाणी कोर्टात नेत असताना त्याने कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. तेव्हापासून तो पोलिसांसाठी वॉन्टेड होता. पलायन केल्यानंतर  माने हा विटा परिसरात आला होता. शुक्रवारी पहाटे विटा शहरातील आडवी पेठ या मध्यवस्तीत राहणाऱ्या सुनिता कोरे यांच्या घरात माने याने दाराची कडी उचकवटून प्रवेश केला. कपाटातील साहित्य त्याने विस्कटले रोख रक्कम खिशात घातली. त्याच वेळी त्यांच्या  मुलाचे जाकीट अंगात घातले. शेजारी झोपलेला कोरे यांचा मुलगा विराज याच्या गळ्यातील सोन्याची साखळी माने यास दिसली, त्याने ती सोन्याची साखळी काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. कोणीतरी हालचाल करत असल्याचे दिसताच सुनीता या झोपेतून जाग्या झाल्या व त्यांनी माने यास जाब विचारत  पकडण्याचा प्रयत्न केला, समोरुन प्रतिकार होत असल्याचे दिसताच माने याने सुनिता यांच्या हाताला जोराचा चावा घेतला तरीही त्यांनी धाडसाने  माने यास रोखून धरले, या झटापटीत कोरे यांचे विराज व सुमित ही दोन्ही मुले जागी झाली आणि त्यांनीही माने यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने या दोन्ही मुलांना चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, या आरडाओरडीत कोरे यांचे शेजारी जमा झाले त्यांनी चोरट्यास चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. विटा पोलिसांनी कसून तपास केला असता माने याचा पूर्वेइतिहास समोर आला. त्यांनी तात्काळ निपाणी पोलिसांशी संपर्क साधला. निपाणी पोलिसांचे पथकही विट्यात दाखल झाले. विटा पोलिसांनी माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे