Sat, Apr 20, 2019 10:28होमपेज › Sangli › राज्यात सरकारच खरे लाभार्थी 

राज्यात सरकारच खरे लाभार्थी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विटा : प्रतिनिधी

सरकारच्या सध्या ‘मी लाभार्थी’ या जाहिराती सुरू आहेत; पण राज्यात सामान्य लोक नाही तर सरकारच लाभार्थी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे फोटो लावा अन् जाहिरात करा, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. टेंभू पाणी योजनेसाठी एकदम निधी द्या, शेतकरी कर्जमाफीबाबत खोट्या आकडेवारीचा खेळ बंद करा, असा घणाघातही त्यांनी सरकारवर केला. 

सांगली जिल्ह्यातील  कार्वे (ता. खानापूर) येथील शेतकरी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, आमदार अनिलराव बाबर, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पाटील, बजरंग पाटील उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, राज्यात सत्ता बदलूनही काहीही फरक पडलेला नाही. लोकांनी पहिले काँग्रेसचे सरकार घालवले आणि भाजपला निवडून दिले कशासाठी? आम्हीही तुम्हाला काहीतरी चांगले कराल म्हणून पाठिंबा दिला ना? आता काय परिस्थिती आहे. कोणाला लाभ मिळाला या सरकारचा. सगळीकडे प्रश्नच प्रश्न, उत्तर कोणाकडेही नाही. शेतकरी संकटात आहे , नोटबंदी , जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक अडचणीत सापडलेत.  मग सत्ता बदलून उपयोग काय झाला? उगाच कसल्या जाहिराती करता ? मी लाभार्थी ! परवा कोणीतरी सांगितले कि म्हणे जे चेहरे वापरलेत त्या जाहिरातीत त्यांना प्रत्यक्षात काही मिळालेच नाही. या साठी लाभार्थींचे फोटो घेतलेच नव्हते. कशासाठी हा खोटारडेपणा. 

ते पुढे म्हणाले, स्वत: च्या स्वार्थासाठी माझ्या शिवरायांचे नाव वापरता. छत्रपती शेतकरी सन्मान योजना आणली जून महिन्यात सांगितले होते कर्ज माफी देऊ , गणपती गेले, दसरा गेला दिवाळी गेली , आता काय  नवे वर्ष सुरु होईल कधी देणार आहात कर्ज माफी. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात साडेदहा हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर गेलेत. मग ते दिसत का नाहीत? अरे मग एक सुद्धा शेतकरी नाही लाभार्थी नाही या गावामधला  ? पाच ते सहा शेतकर्‍यांना केवळ ते मिळाले असतील तेही अजून  त्यांच्या खात्यावर आले नसतील. 

अपूर्ण पाणी योजना

टेंभू योजनेबाबत ते म्हणाले , पहिला टप्पा , दुसरा , तिसरा , चौथा टप्पा  अरे काय चाललंय. टप्प्या टप्याचे काय चाललंय ? एकदम का देऊन टाकत नाहीत. तिकडे विदर्भ मराठवाड्याच्या लोकांच्या साठी इथे का अन्याय चालवला आहे ? अरे जो उपाशी आहे त्याला जेवू घालणे ठीक आहे पण तो जो उपाशी नाही त्याला चार दिवस तू जेवायचे नाहीस. तू थांब असे कसे सांगता ? ज्या सिंचनाच्या योजना 1995 ला आम्ही सुरु केल्यात त्या  अजून पूर्ण केल्या नाहीत. सध्या एकही नवीन योजना सुरु करता येत नाही. म्हणजे ज्या जुन्या योजना आहेत त्याच्यावर पैसे घालायचे. हे कुठवर चालणार? 

आ. बाबर म्हणाले,  जिल्ह्यात 2011 पासून शेती पंपाची 13 हजार कनेक्शन पेंडिंग आहेत. मागेल त्याला शेत तळे अशी भूमिका जशी सरकार घेते तसा येथेही मागेल त्याला वीज कनेक्शन द्या. मराठावाडा, विदर्भ भागात 2016 पर्यंत कनेक्शन्स दिली जात आहेत. माझा कुठल्या भागाला विरोध नाही पण कुपोषिताला कितीही जेवण दिलं तरी ते सदृढ होणार नाही. यंत्रमागाच्या वीज बिल अनुदानाबाबत निर्णय झाला आहे. पण अंमलबजावणी झालेली नाही. टेंभूबाबत आपण गती देण्याचा प्रयत्न केला आहे. चौथ्या आणि पाचवा टप्प्याच्या कामांना गती देण्याबाबत आपण तातडीने पाऊले उचलावीत या मागणीसाठी  दबाव गट निर्माण करून सरकारकडून त्यापूर्ण करून घेऊ. 

सुहास बाबर यांनी प्रास्ताविक केले.  यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून नितीन जाधव, संभाजी जाधव, व्यापारी असोशिएशनचे विपुल शहा, फटाके व्यावसायिक राजू मुल्ला आदींची भाषणे झाली. संजय विभुते यांनी आभार मानले.