Tue, Jul 16, 2019 22:10होमपेज › Sangli › विश्‍वजित कदम आमदारपदी बिनविरोध 

विश्‍वजित कदम आमदारपदी बिनविरोध 

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:26AMकडेगाव  : वार्ताहर/शहर प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजप पक्षाच्या प्रदेश पातळीवर झाल्याने येथील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अन्य 7 अपक्षांनी अर्ज माघारी घेतल्याने डॉ. विश्‍वजित कदम यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ आणि  संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी अर्जही भरला होता; परंतु पक्षाच्या धोरणानुसार एखाद्या आमदारांचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य निवडणूक लढविणार असेल तर  तेथे उमेदवार न देण्याची  भाजपची संस्कृती आहे. तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विरोधात भाजपने निवडणूक लढविली नव्हती. 

ते पुढे म्हणाले, डॉ. कदम हे राज्यातील ज्येष्ठ नेते होते.भाजपमधील सर्व नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबध होते.तसेच विधानसभेतील  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ.विश्‍वजित कदम यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपने माघार घेण्यासंदर्भात विनंती केली.  दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर  ही पोटनिवडणूक लढवायची नाही असा निर्णय झाला.

सन 1996 मध्ये (स्व.)आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसने पोटनिवडणूक लढविली होती. त्यामुळे भाजपनेही  यावेळी  निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी म़ागणी केली होती. या संदर्भातील प्रश्नावर ना. पाटील म्हणाले , कोणी काय केले यावर आमच्या पक्षाचा निर्णय ठरत नसतो. आमच्या पक्षाची संस्कृती व परंपरा  यांना अनुसरूनच  ही पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला जात आहे.

संग्रामसिंह देशमुख म्हणाले,  ही पोटनिवडणूक लढवावी  अशी आमच्या कार्यकर्त्यांचीही  प्रबळ इच्छा होती;परंतु पक्षाच्या आदेशानुसार  आणि  देशमुख घराण्याच्या संस्कृती व परंपरेनुसार आम्ही ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.                 

बंद खोलीत दोन तास  चर्चा                           

कडेपूर येथे पृथ्वीराज देशमुख यांच्या निवासस्थानी ना. चंद्रकांत पाटील,  पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांच्यात सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा झाली.  त्यावेळी भाजपच्या   कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.