Mon, Mar 25, 2019 02:53
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › पलुस-कडेगाव पोटनिवडणूक; काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी

पलुस-कडेगाव पोटनिवडणूक; काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी

Published On: Apr 30 2018 6:03PM | Last Updated: Apr 30 2018 6:09PMसांगली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेसचे नेते डॉ.पंतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत यांना उमेदवारी दिली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान, तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

निवडणूक आयोगाने देशातील चार लोकसभा आणि दहा राज्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार पुरूष मतदार 1 लाख 35 हजार 663, स्त्री मतदार 1 लाख 29 हजार 635, अन्य मतदार 3, असे एकूण 2 लाख 65 हजार 301 मतदार आहेत. 

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.  2 लाख 63 हजार 704 मतदान ओळखपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात 282 मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी नेमणूक आणि आवश्यक वाहनांचे अधिग्रहण पुरेशा प्रमाणात करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख आहेत.  

कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे आणि पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक प्रक्रिया 2 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.