Wed, Sep 26, 2018 08:55होमपेज › Sangli › आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व विनायक साळुंखे करणार

आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व विनायक साळुंखे करणार

Published On: Jul 20 2018 6:53PM | Last Updated: Jul 20 2018 7:03PMसांगली : प्रतिनिधी 

अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात होणार्‍या ‘आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत’ भारताचे नेतृत्व वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे करणार आहेत. यामुळे जागतीकस्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे. अमेरिकेतील ‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे 24 जुलै ते 2 ऑगस्ट  या  दरम्यान’यंग लिडर्स ऍक्सेस प्रोग्राम’साठी जगभरातून 50 युवकांची निवड झाली आहे. यात भारतातून विनायक साळुंखे यांचा समावेश आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निवडीसाठी तीन फेर्‍या घेण्यात आल्या. यासाठी जानेवारीमध्ये निबंध स्पर्धेची पहिली फेरी घेण्यात आली. ऐच्छिक विषयांवरील या निबंध स्पर्धेत विनायक यांनी ‘ग्रामीण भागातील बेरोजगारी व त्यावरील उपाय’ या विषयावर विवेचन केले. मार्च महिन्यात व्हिडीओव्दारे यासंदर्भात मुलाखत तर, एप्रिल महिन्यात ‘फिल्ड असेसमेंट सर्वे’ होवून मे  मध्ये सांळुखे यांची अंतिम निवड करण्यात आली. 

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असणार्‍या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी ‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’ ही संस्था संधी उपलब्ध करून देते. जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या तरुणांच्या विचार आणि कल्पनांच्या देवाण घेवाणीतून प्रत्येकाला आपल्या समाजात असणार्‍या समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. ग्रामीण तरुणांच्या समोरील बेरोजगारी या समस्येवर विनायक या परिषदेत चर्चा करणार आहेत.

मिरजवाडी या छोटयाशा खेड्यातील विनायक यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या18 व्या वर्षांपासून नेहरू युवा केंद्राशी ते संलग्न असून ग्रामीण तरुणांसोबत त्यांच्या समस्यांवर ते काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची ’मुख्यमंत्री फेलोशिप’साठी देखील निवड झाली होती. ‘युवक बिरादरी, भारत’ या संस्थेच्या 2017च्या 'युवा भूषण’पुरस्काराचे ते विजेते आहेत.