Fri, Apr 26, 2019 09:39होमपेज › Sangli › विकास आघाडी- राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र

विकास आघाडी- राष्ट्रवादीतील संघर्ष तीव्र

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:48PMइस्लामपूर : मारूती पाटील

नागरिकांच्या प्रश्‍नांवर ‘आक्रमक व्हा ...सत्ताधार्‍यांना घेरा’,  असा आदेश आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे.त्यानंतर पालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी थेट ऊस दराचाच प्रश्‍न हातात घेऊन आमदार पाटील आणि राष्ट्रवादीला  कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पालिकेत विरोधी राष्ट्रवादी गट शांतच होता. अंतर्गत गटबाजीमुळे विरोधी गटाची कणखर भूमिकाही ते प्रभावीपणे पार पाडताना दिसत नव्हते. भुयारी गटर योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दाही सत्ताधारी शिवसेनेनेच प्रथम उपस्थित केला. त्यानंतर विरोधक म्हणून राष्ट्रवादीला नाईलाजास्तव या प्रश्‍नात उडी घ्यावी लागली. त्या आधी घरपट्टी व इतर काही प्रश्‍नांवर राष्ट्रवादीने आंदोलने केली होती. पालिका सभेतही विश्वास डांगे, शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव हे नगरसेवक आक्रमक होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पालिकेत शांतताच होती.

गेल्या आठवड्यात  जयंत पाटील यांनी येथील यशोधननगरमध्ये  भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून येथे दूषित पाणी व रोगराईची समस्या आहे. यावेळी आमदार पाटील यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर टीका केली होती. तसेच नागरिकांच्या प्रश्‍नावर आक्रमक व्हा, असा आदेशही त्यांनी आपल्या नगरसेवकांना दिला. त्यामुळे आता रस्ते, कचरा अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांवर ते आवाज उठवू लागले आहेत. उपनगराध्यक्ष दादासाहेब  पाटील व नगरसेवकांनी शौचालय अनुदानासाठी उपोषणही केले.

आता आमदार पाटील यांनी पालिकेत लक्ष घातल्याने सत्ताधारीही त्यांच्या विरोधात आक्रमक होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निशिकांत  पाटील यांनी शेतकरी संघटनांना बरोबर घेऊन थेट ऊस दराच्याच प्रश्‍नाला हात घातला आहे. राजारामबापू कारखाना  उसाची बिले थांबवून शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकंदरीतच  विधानसभा निवडणूक दूर असतानाच इस्लामपूरमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील  संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.