होमपेज › Sangli › बदलत्या तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकीत अमर्याद संधी 

बदलत्या तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकीत अमर्याद संधी 

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी

बदलत्या तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. पुढील शतक हे अभियांत्रिकीचे असेल, असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पीसीईटीचे प्राध्यापक विजय नवले यांनी व्यक्त केले. 

विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी - एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट  या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन दि. 1 ते 3 जून दरम्यान करण्यात आले आहे. 

सांगलीमध्ये कच्छी जैन सेवा समाज भवन, सांगली-मिरज रोड  येथे हे प्रदर्शन सुरू आहे. यावेळी ‘बारावी व अभियांत्रिकातील करिअर आणि प्रवेश प्रकिया’ या विषयावर प्रा. नवले यांनी मार्गदर्शन केले. 
ते म्हणाले, सध्या अभियांत्रिकीला फारसा स्कोप नाही, असे बोलले जात आहे. पण ते साफ चुकीचे आहे. तो अधिक वाढत आहे. यामुळेच महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. पुढील काळात अभियांत्रिकीचा स्कोप अधिकच वाढत जाणार आहे. कारण तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. मेडिकल, शेती, अ‍ॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, टेलिकॉम यात प्रचंड वेगाने बदल घडत आहे. दररोज नव-नवीन शोध लागत आहेत. यात अभियांत्रिकी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आगामी काळात सध्यापेक्षाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग मोठा असेल. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठी मागणी असणार आहे.  अभियांत्रिकीच्या  प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांनी नेमकी माहिती घेऊन अचूकपणे फॉर्म भरणे महत्वाचे आहे. 

ते पुढे म्हणाले, कोणत्याही  क्षेत्राला स्कोप नाही असे कधीच होत नाही. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या क्षेत्राला स्कोप दिला आहे.  त्यामुळे आनंद वाटणारे काम निवडा. काम वाढल्यानंतर आनंद वाटत असेल ते करिअर निवडा.

प्रदर्शनात आज होणारी व्याख्याने 
वक्ते : पुणे येथील युनिक अकॅडमीचे हर्षल लवंगारे, विषय  : 10वी, 12वी नंतरच्या स्पर्धा परीक्षेची तयारी, वेळ : 11.00 ते 12.00., वक्ते : विश्‍वकर्मा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सुनील डोके, विषय : शोधूया करिअरच्या नवीन दिशा,  वेळ : 12.00 ते 1.00, वक्ते : चाटे शिक्षण समूहाचे सीईओ प्रा. एस. जे. पाटील, विषय : करिअर निवडताना घ्यावयाची दक्षता, वेळ : सायंकाळी 5.00 ते 6.00, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे जनसंपर्क अधिकारी सुनील धनगर, विषय : आजची तरुणाई दशा आणि दिशा, वेळ : सायंकाळी 6.00 ते 7.00, स्थळ : कच्छी भवन,  सांगली मिरज रोड.