Fri, Apr 19, 2019 08:47होमपेज › Sangli › पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार ‘प्रभारी’

पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार ‘प्रभारी’

Published On: Apr 24 2018 8:56PM | Last Updated: Apr 24 2018 8:56PMसांगली : उध्दव पाटील

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यात 102 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यातील 76 दवाखाने श्रेणी- 1 चे आहेत. पशुसंवर्धन विभागाला डॉक्टरांच्या (पशुधन विकास अधिकारी) रिक्त पदांचा प्रश्‍न गेली दहा-बारा वर्षे सतावत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांकडील डॉक्टरांची जवळपास 60 टक्के पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार पशुधन विकास अधिकार्‍यांऐवजी पशुधन पर्यवेक्षकांच्या ‘प्रभारी’ कार्यभारावर सुरू आहे. नवीन नियुक्तीत अवघे 2 डॉक्टर ‘पशुसंवर्धन’ ला मिळाले आहेत. 

गेल्या दहा-बारा वर्षात या विभागाकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असणे हेही आता कोणाला वावगे वाटेना झाले आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत  यासाठी गेल्या दहा वर्षात अनेक ठराव झाले. मात्र ते केवळ कागदावर राहिले. नुकतेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या 67 उमेदवारांना शासनाने नियुक्ती दिलेली आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेकडे 2 आणि जिल्ह्यात स्टेट पशुसंवर्धनच्या दवाखान्यांकडे 2 पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले आहेत. 

तालुक्यातील सर्व दवाखाने प्रभारी

नवीन नियुक्तीद्वारे जिल्हा परिषदेच्या कडेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याकडे डॉ. वृषाली मस्के, उमदी पशुवैद्यकीय दवाखान्याकडे डॉ. प्रशांत देशमुख, तर शासनाकडील दूधगाव पशुवैद्यकीय दवाखान्याकडे डॉ. हेमंत मोरे व तासगाव पशुचिकित्सालयाकडे झाली आहे. डॉ. देशमुख उमदीला हजर झाले आहेत, पण डॉ. मस्के अद्याप कडेगावला रूजू झालेल्या नाहीत. कडेगाव तालुक्यात श्रेणी- 1 चे 8 व श्रेणी-2 चा  एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तालुक्यात पूर्णवेळ नियुक्त एकही पशुधन विकास अधिकारी नाही. पशुधन पर्यवेक्षकांमार्फत प्रभारी कामकाज सुरू आहे. 

कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ,  जत तालुका रिक्त

जत तालुक्यात श्रेणी-1 चे 15, श्रेणी-2 चे 9 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकार्‍यांची 15 पदे मंजूर आहेत. पण केवळ 4 पदे कार्यरत होती. दोन दिवसांपूर्वी नवीन नियुक्तीतील डॉ. देशमुख उमदीला रुजू झाल्याने कार्यरत पदांची संख्या  5 झाली 

असून रिक्त पदे 10 आहेत. कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात  पशुधन विकास अधिकार्‍यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. पशुधन विकास अधिकार्‍यांची तालुकानिहाय कार्यरत पदे (कंसात रिक्त पदे) : कडेगाव- 0 (8), कवठेमहांकाळ- 1 (5), जत- 5 (10), शिराळा- 4 (11), मिरज- 7 (2), खानापूर-  4 (5), आटपाडी- 5 (2), तासगाव- 3 (1), पलूस- 2 (2), वाळवा- 6 (3). जिल्हा परिषद मुख्यायासाठी पशुधन विकास अधिकार्‍यांचे एक पद मंजूर असून ते कार्यरत आहे. 

Tags : sangli, Veterinary dispensary doctor,  vacant post issue,  sangli news,