Wed, Jan 16, 2019 13:30होमपेज › Sangli › गांडूळ खतातून उसाच्या अर्थकारणाला नवसंजीवनी

गांडूळ खतातून उसाच्या अर्थकारणाला नवसंजीवनी

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:22PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

पारंपारिक शेतीतून उत्पन्नाला मर्यादा येत असल्याने शेती तोट्याची ठरत आहे. मात्र पारंपारिक शेतीला नाविण्याची जोड देत, शेतातच गांडूळ खत तयार करुन त्यातून ऊसशेतीचे उत्पादन दुप्पटीने साधण्याची किमया मिरज पूर्व भागातील संजयकुमार आप्पासो कोळी या आरग येथील प्रयोगशील शेतकर्‍याने साधली आहे.  ऊसशेतीच्या अर्थकारणाला नवसंजीवनी देत त्यांनी अन्य शेतकर्‍यांसमोर एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे.

पाण्याची बेताची उपलब्धता, टंचाईचे सावट आणि शेतीचे महागडे अर्थकारण या कोंडीत   सामान्य शेतकरी गुरफटला आहे. मात्र याही परिस्थितीत पारंपारिक शेती करणारे संजयकुमार कोळी यांनी मोठ्या जिद्दीने शेतीचे उत्पन्न दुप्पटीने वाढविले.  कोळी यांची सात एकर शेती, विहिरीच्या पाण्यावर शेती पिकविताना उत्पन्न मात्र मनासारखे येत नव्हते, शेतीत हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता.  यातूनच त्यांनी राहुरी विद्यापीठाशी संपर्क साधला,  त्यांना गांडूळ खत वापरण्याचा सल्ला देण्यात आला. प्रथम त्यांनी नॅडेप पद्धतीने तर सन 2009-10 मध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती सुरू केली. घरीच आठ जनावरे असल्याने शेण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. शेण, वाळलेला पालापाचोळा याचा वापर करुन त्यांनी गांडूळ खत निर्मितीचे बेड तयार केले. महिन्याला साधारणपणे सोळा ते सतरा मे. टन खताची निर्मिती होते.  यातून व्हर्मीवॉश देखील मिळते, याचा वापर ते पिकांवर फवारणीसाठी करतात शेतासाठी पुरेसे वापरुन राहिलेले गांडूळ खत ते बाजारात विकतात.

आठ हजार रुपयांच्या दरम्यान प्रतिटन  दर मिळत असल्याने त्यांना  फायदा होऊ लागला आहे. तर याच दरम्यान, एकरी 40 मे. टनाच्या दरम्यान मिळणारे उसाचे उत्पादन आता तब्बल 80 मे. टन निघू लागले आहे.  हे केवळ गांडूळ खतामुळेच साध्य झाल्याचे कोळी सांगतात. तसेच गांडूळ खताच्या वापराने शेतीची उत्पादकता कायम राहते, पिकांचे उत्पन्न तर दुप्पट झाले आहे, शिवाय गांडूळ खत विकून मिळणारे उत्पन्न वेगळेच! गांडूळ खताची निर्मिती आणि शेतात वापराने कोळी यांनी आपल्या शेतीचे अर्थकारणच बदलले आहे.  त्यांच्या या कृतिशीलतेला शासनाने देखील कृषिमित्र पुरस्कार देऊन जणू त्यांच्या नाविण्यशीलतेला सलाम केला आहे...!

Tags : sangli, sangli news, Vermicompost, Navsajivani, sugarcane,