Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Sangli › संवर्ग 1 व 2 ‘लाभार्थीं’च्या कागदपत्रांची होणार पडताळणी 

संवर्ग 1 व 2 ‘लाभार्थीं’च्या कागदपत्रांची होणार पडताळणी 

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 11:07PMसांगली : प्रतिनिधी

राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील शिक्षक बदल्यांमध्ये संवर्ग 1 (गंभीर  आजार, अपंग, विधवा, परित्यक्ता, कुमारीका, मतीमंद मुलांचे पालक, 53 वर्षांवरील शिक्षक) व संवर्ग 2 (पती-पत्नी एकत्रिकरण) च्या लाभार्थी  शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोलापूरच्या शिष्टमंडळाला तसे सांगितले आहे. त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. मंत्री मुंडे यांच्या या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील विस्थापित संघर्ष समितीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री बदली प्रक्रियेत संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून बदली आदेश देणे अपेक्षित असताना पडताळणी न करताच बदली आदेश दिले आहेत. खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळवली असल्याकडे त्यांनी मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.  
बदली प्रक्रियेत संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे संवर्ग 2 मधून बदलीचा लाभ घेणार्‍या शिक्षक पती-पत्नी संदर्भातही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशित केले असल्याचे मंत्री मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगितलेले आहे. 

तपासणीची मागणी सांगलीतूनही

बदली अधिकारपात्रसाठी काही शिक्षकांनी सादर केलेले वैद्यकीय दाखले तपासावेत, अशी मागणी सांगली जिल्ह्यातूनही काही शिक्षकांनी केलेली आहे. बदलीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करताना जिल्हा परिषदेतील सेवा विचारात घेऊन सेवाज्येष्ठता यादी तयार करावी असा नियम असताना काहींनी महापालिका शाळेतील सेवाज्येष्ठताही धरून सोयीची शाळा बळकावली असल्याचा आरोपही काही शिक्षकांनी केलेला आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेले काही शिक्षक बदलीपात्र नसतानाही बदली प्रक्रियेत घुसल्याचीही तक्रार आहे. संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या लाभासाठीची कागदपत्रे तसेच सेवाज्येष्ठतेसंदर्भातील तक्रारींची शहानिशा होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागातून दिले. 

बदली अधिकारपात्रमध्ये  संवर्ग 2 हा ‘पती-पत्नी एकत्रिकरण’चा आहे. पती-पत्नी एकत्रिकरणसंदर्भात यापूर्वीच्या शासन निर्णयात स्पष्टता आहे. पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद सेवेत तर दुसरी व्यक्तीही त्याच जिल्हा परिषद सेवेत अथवा खासगी शाळा, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी अथवा खासगी संस्थेत सेवेत असलेले असे नमुद होते. मात्र नवीन शासन निर्णयात पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद व दुसरी व्यक्तीही जिल्हा परिषद सेवेत  अथवा इतर असे नमूद आहे. इतर म्हणजे काय? त्याची स्पष्टता नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. 

पती-पत्नी एकत्रिकरण : समर्थन असेही ! 

पती-पत्नी 30 किलोमीटर अंतराच्या बाहेर असेल तर बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेणे अपेक्षित आहे. पण आम्ही 30 किलोमीटरच्या आत आहे; 30 किलोमीटरच्या आतच रहावे यासाठी पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ हवा आहे हा पर्याय निवडल्याचे काही शिक्षक सांगत आहेत. पती-पत्नी एकत्रिकरणचा असा सोयिस्कर अर्थ लावला जात असल्याकडेही काही शिक्षकांनी लक्ष वेधले आहे.