Thu, Jun 27, 2019 11:53होमपेज › Sangli › पाणी योजनांमुळे भाजीपाला लागवड वाढली 

पाणी योजनांमुळे भाजीपाला लागवड वाढली 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:12PMलेंगरे : जे. डी. जगदाळे

खानापूर तालुक्यात उन्हाळी भाजीपाला लागवडीची शेतकर्‍यांनी जोरदार तयारी केली आहे. टेंभू, ताकारी, आरफळ या योजनेचे पाणी तालुक्यात आल्याने सुमारे एक हजार एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड अपेक्षित आहे. 

तालुक्यात उन्हाळी हंगामात  ढबू मिरची, टोमॅटो, दोडका, कारली, वांगी या भाजीपाल्याची मार्च, एप्रिल महिन्यात लागवड केली जाते. शेतकरी भाजीपाला लागवड करताना शेणखत, कोंबडी खत, ठिबक, मल्चिंग, कपातील रोपे वापरतात. उन्हाळ्यात खात्रीशीर पाण्याची व्यवस्था बघूनच भाजीपाला लागवड करतात. काही शेतकरी खंडाने जमिनी घेतात. उन्हाळी हंगामातील भाजीपाला जून, जुलै महिन्यात तोडणीस सुरू होतो. नेमका यावेळी बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळतो असे अनेक शेतकर्‍यांचा अनुभव असल्याने शेतकरी प्रयत्नाची पराकाष्टा करुन उन्हाळ्यात भाजीपाल्याची जोपासना करतात. 

उन्हाळी भाजीपाल्यासाठी भांडवली खर्च मोठा होतो. कमी दिवसात उत्पन्न मिळवून देणार्‍या ढबू, टोमॅटो पीक लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल असतो. यावर्षी माहुली, वलखड, देविखिंडी, वेजेगाव, भाग्यनगर, साळशिंगे, विटा, पारे, कुर्ली परिसरात टेंभू योजनेचे तर भाळवणी, बलवडी, कार्वे परिसरात ताकारी योजनेचे पाणी आले आहे. या पाण्यामुळे ओढे, नाले, बंधारे, तलाव पाण्याने भरले आहेत. उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना पाणी पुरेसे मिळणार असल्याने यावर्षी भाजीपाला क्षेत्रात वाढ होणार आहे. 

यावर्षी भाजीपाला क्षेत्रात वाढ होणार असून सुमारे एक हजारावर एकरावर लागवड अपेक्षित आहे. शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवडीची तयारी सुरू केली आहे. तलाव परिसरात पाण्याची खात्री असलेल्या ठिकाणी खंडाने जमिनी घेतल्या आहेत. यावर्षी एकरी वीस हजार रुपये खंडाचा दर झाला आहे. भाजीपाला लागवड करण्याच्या शेतीत नांगरट करणे, फणपाळी मारणे, खते पसरणे, बेड सोडणे, ठिबक , रोपवाटिकेत रोपांची आगावू नोंदणी करणे अशी कामे सुरू झाली आहेत. दोन वर्षापासून उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाल्याला बाजारात चांगला दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवडीची जोरदार तयारी केली आहे.