Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Sangli › वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्त होणार

वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्त होणार

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:24PMसांगली : प्रतिनिधी

वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार दुरुस्त होणार आहे. जिल्हा बँक संचालक मंडळ बैठकीत तसा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाडेकरारावरून संचालक मंडळ सभेत जोरदार चर्चा झाल्याचे समजते.  

जिल्हा बँकेत सोमवारी संचालक मंडळ सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार अनिलराव बाबर, मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, महेंद्र लाड, सुरेश पाटील, डॉ. प्रताप पाटील, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोरे, कमलताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, व्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. 

वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात जिल्हा बँक-वसंतदादा कारखाना व भाडेकरू श्री दत्त इंडिया लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय भाडेकरार झालेला आहे. भाडेकरारासंदर्भात बँकेने नियुक्त केलेल्या चार्टर्ड अकौंटंट फर्मने मते व्यक्त केलेली आहेत. त्यावर संचालक मंडळ सभेत चर्चा झाली. करारापूर्वी वकिलांचा लेखी सल्ला, अभिप्राय घेतले होते का, यावरून एका संचालकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान जिल्हा बँकेच्या हिताला बाधा येणार नाही, अशा पद्धतीने भाडेकरारात दुरुस्ती करण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. भाडेकरू दत्त इंडियाने जमा केलेले 60 कोटी रुपये अनामत रक्कम कारखान्याकडे अनामत दाखवावी व ही रक्कम बँकेकडे कर्जखात्याला वळती करावी, अशी दुरुस्ती संचालकांनी सुचवली आहे. कारखान्याच्या देण्यांमध्ये बँकेने अडकू नये, तशा प्रकारची दुरुस्ती करावी, असेही संचालकांनी सुचविले असल्याचे समजते.