होमपेज › Sangli › वारणा पट्ट्यात हुमणीचा प्रादुर्भाव

वारणा पट्ट्यात हुमणीचा प्रादुर्भाव

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 7:52PMकोकरूड : नारायण घोडे  

शिराळा तालुक्याच्या वारणा टापूत हुमणी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. किडीमुळे जमिनीतील पिके वाळू लागली आहेत. पावसाच्या अवकृपेमुळे खरीप व रब्बी हंगाम रिकामा गेला आहे. त्याची अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच हुमणीच्या आक्रमणामुळे शेलक्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी पुरता हबकला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. 

चांदोली धरणामुळे वारणा नदी बारमाही वाहत असते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसासह अन्य नगदी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळवला आहे. जोडीला नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण, यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. पाण्यासाठी वणवण आहे. शेलक्या उसासह खरीप हंगामातील ज्वारी, (शाळू) गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण हंगाम रिकामा गेला आहे. असे असतानाही शासनाने नुकसान भरपाई दिलेली नाही. तर दुसरीकडे गुर्‍हाळातील गुळालाही व्यापार्‍यांनी दर दिलेला नाही. यामुळे खते, बी बियाणे आदींचा खर्च अंगावर आला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात हुमणी किडीचा प्रादूर्भाव होत आहे. मोक्याच्या क्षणी किडीचे शेलक्या उसावर व अन्य पिकांवर आक्रमण वाढते आणि होत्याचे नव्हते होते. हे नित्याचेच बनले आहे. तशीच परिस्थिती यावर्षीही झाली आहे. वारणा काठावरील अनेक गावातील शिवारात हुमणी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेलक्या उसासह, मका व भाजीपाल्यावरही हुमणीने आक्रमण केले आहे. यामुळे बळीराजा हबकला आहे. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी कोवळा ऊस, अंतिम टप्प्यातील मका कापून जनावरांना चारा म्हणून घालण्यास प्रारंभ केला आहे.  

प्रत्येक वर्षी विश्‍वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत किडीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न होतो. त्याचबरोबर कृषी विभागामार्फतही प्रयत्न होतो. परंतु कीड आटोक्यात येत नाही. भरमसाठ खर्च करून पिके जोमात आणायची आणि किडीमुळे वाळून जायची, हे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.   या परिसरात शेतकरी अल्पभूधारक आहे. शेती पिकांवरच वर्षाचे आर्थिक नियोजन असते. बी बियाणे, खते, मजूर यांचे वाढलेले दर आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ घालणे शेतकर्‍याला दुरापास्त झाले आहे. त्यातच हुमणीमुळे पिकेच नष्ट होत असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला  आहे.  हुमणी किडीमुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. त्यातून सुटका होण्यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण ही कीड आटोक्यात आणणे मुश्किल झाले  आहे. मध्यंतरी धारवाड विद्यापीठातर्फे शेणखतामध्ये मिसळून मेटारायझीन बुरशी वापरण्यात आली.