वाळवा : धन्वंतरी परदेशी
हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी काँग्रेसमध्ये जाणार की राष्ट्रवादीमध्ये जाणार, याबाबत कायमच चर्चा असतात. मात्र त्यांच्या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘नागनाथ अण्णांच्या आत्म्याला काय वाटले असेल’, असे वक्तव्य केले. तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांतून अशीच चर्चा चालू आहे. नायकवडी यांच्या या ‘यु टर्न’च्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. आयुष्यभर जातीयवादी धर्मांध शक्ती म्हणून भाजप, शिवसेना या पक्षांपासून ते लांब राहिले. कायमच त्यांनी आपल्या व्यासपीठावर भाजप-सेनेला स्थान दिले नाही किंवा ते त्यांच्या व्यासपीठावर कधीही गेले नाहीत. कायमच त्यांनी अंतर ठेवले. शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, प्रकल्पग्रस्त, कष्टकरी जनतेसाठी सतत अण्णा लढत राहिले. त्यासाठी वेळप्रसंगी प्रस्थापितांशी कायमच संघर्ष केला. या संघर्षाच्या जोरावर त्यांनी सरकारला अनेकदा नमवले. त्यांच्या स्वभावामुळे ठराविक पक्ष त्यांच्यापासून लांब राहिले. त्याबरोबर त्या पक्षांचे नेतेही कधी जवळ गेले नाहीत. त्यांचे अण्णांच्या जवळ जाण्याचे धाडसही झाले नाही. कारण परिवर्तनाच्या चळवळीसाठी आयुष्य झोकून देणारे अण्णा सार्या महाराष्ट्राला चांगलेच परिचित होते.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृतीशील वारसदार म्हणून अण्णांना ओळखले जाते. त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तरीसुद्धा देशभरातल्या काँगे्रस, डावी आघाडी आणि त्याच विचारांच्या नेतेमंडळींशी त्यांची सलगी होती. विचारांशी ठाम राहून स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही इतिहास निर्माण केला. बाबरी मशीद पाडल्यानंतर पहिला निषेधाचा मोर्चा वाळव्यात काढला, जातीयवादी शक्तींचा बिमोड दिन सुरू केला. त्यामुळे नागनाथअण्णा शेवटपर्यंत आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिले. आजही त्यांच्या नावावरती अनेक चळवळी सुरू आहेत.
अण्णांचे सुपुत्र वैभव नायकवडी गेल्या 15 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. मात्र कोणत्याही पक्षामध्ये अधिकृतरित्या नाहीत. बर्याचदा त्यांनी सोयीप्रमाणे राजकारण आणि समाजकारण केले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक नेत्यांशी त्यांनी आपले संबंध जिव्हाळ्याचे ठेवले. नुकतेच कराड येथे बोलताना खा. शरद पवार म्हणाले, वाळव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार आहेत हे ऐकल्यानंतर क्रांतिवीर नागनाथअण्णांना काय वाटत असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. पवार यांच्या या वक्तव्याचा जाणकार राजकारण्यांनी योग्य तो अर्थ जाणून घेतला.
माजी मंत्री पतंगराव कदम यांनी अण्णांच्या उपस्थितीत अण्णा, वैभवला आमच्या ताब्यात द्या, असे एका जाहीर सभेत आवाहन केले होते. तर वैभव नायकवडी यांनी विधानसभेला जयंत पाटील यांना आव्हान देवून निवडणूक लढविली होती.
त्यामुळे वैभव नायकवडी हे काँगे्रसमध्ये जातात की राष्ट्रवादीमध्ये जातात याबाबत कायमच राजकीय वर्तुळात चर्चा राहिली आहे. मात्र भाजपसारख्या पक्षामध्ये ते कधीही जाणार नाहीत, यावरती अण्णाप्रेमी जनतेचा अजूनही विश्वास आहे.
परंतु सध्या सुरू असलेल्या चर्चा पाहता वैभव नायकवडी यांनी घेतलेला ‘यु टर्न’ अण्णाप्रेमी जनतेला किती रुचणार? खरंच ते भाजपमध्ये सहभागी होणार का, की त्यांनाही झुलवत ठेवले जाणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.