Fri, Jul 19, 2019 05:45होमपेज › Sangli › रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दादागिरी?

रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दादागिरी?

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:55PMमिरज : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली असल्याने रेल्वेत अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकणार्‍या फेरीवाल्यांनींही आपले बस्तान बसविले आहे. मिरज-सांगली दरम्यान सुमारे दीडशे फेरीवाले असून त्यांच्यातील वेगवेगळ्या गटात कायम संघर्ष सुरू असतो.प्रवाशांना न जुमानता चहा, भेळ, इडलीवडा व अन्य खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले रेल्वेत दादागिरी करीत आपला व्यवसाय करीत आहेत. रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून फेरीवाल्यांवर जुजबी कारवाई केली जाते व सोडून दिले जाते. त्यामुळे फेरीवाल्यांची दादागिरी आणखी वाढली आहे. याकडे सुरक्षा यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे मालमत्ता आणि प्रवासी सुरक्षेकरीता केंद्र सरकारच्या अखत्यारितील रेल्वे सुरक्षा बल (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारितील रेल्वे पोलिस कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे चोर्‍यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. भविष्यकाळात रेल्वेचा वाढता विस्तार लक्षात घेऊन मिरज, कोल्हापूर आणि नीरापर्यंत असलेल्या भागाचे आता विभाजन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सातारा येथे स्वतंत्र आरपीएफ कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच 1 जानेवारी 2019 पासून कोल्हापूर व सातारा येथे नव्याने रेल्वे पोलिस ठाणे स्वतंत्रपणे सुरू होत आहे.

रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे विभाजन होऊन नवीन कार्यालय होऊ घातले आहे. असे असलेतरी रेल्वेतील फेरीवाल्यांच्या वाढत्या कारवायांकडे दुर्लक्षच होताना दिसून येते. स्थानकामध्ये थांबलेल्या गाडीमध्ये आणि धावत्या गाडीमध्येही हे फेरीवाले आपला व्यवसाय करतात. स्थानकात गाडी आल्यानंतर प्रवासी उतरण्याआधी फेरीवाले गाडीमध्ये चढण्याची गडबड करतात. त्यामुळे अनेकवेळा फेरीवाले व प्रवासी यांच्यात संघर्ष होतो. व्यवसाय करण्यावरुन फेरीवाल्यांच्या अनेक गटांमध्ये सतत संघर्ष आणि हातगाई होताना दिसते. बर्‍याचवेळा सशस्त्र मारामार्‍याही झाल्याच्या घटना आहेत. परंतु अपवाद वगळता बर्‍याच घटना परस्पर मिटविल्या जातात.

मिरज रेल्वे जंक्शन असल्यामुळे चोवीस तास 70 ते 75 पॅसेंजर, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, हमसफर गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे प्रवाशांची सतत वर्दळ असते. मिरज-सांगली दरम्यान सुमारे दीडशे फेरीवाले आपला व्यवसाय अनधिकृतपणे रेल्वेचे नियम डावलून करीत असतात. त्याचप्रमाणे मिरज-कोल्हापूर ते मिरज-जेजुरीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये फेरीवाले कार्यरत असतात. रेल्वेची या फेरीवाल्यांना मान्यता नसली तरी रेल्वेत त्यांचीच दहशत चालते. याकडे मध्य रेल्वेचेही दुर्लक्ष आहे.मिरज रेल्वेस्थानकात तीन अधिकृत कॅन्टीन आहेत. या कॅन्टीन धारकांचे आणि तीन खासगी अनधिकृत ठेकेदारांचे फेरीवाले आपला व्यवसाय करतात. बर्‍याचवेळा प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ घ्यावे लागतात. प्रवाशांकडून तक्रारी झाल्या तर आणि फेरीवाल्यांच्या गटांमध्ये संघर्ष झालातर काही दिवस फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद केला जातो. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षततेला वाली कोण, असा सवाल केला जात आहे.     

अनधिकृत प्रवाशांवर कारवाई तर फेरीवाल्यांवर का नाही?

रेल्वे स्थानकात तसेच धावत्या गाडीमध्ये रेल्वे नियमांचा भंग करणार्‍या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. स्थानकाच्या गेटवर प्रवाशांचे तिकीट तपासले जाते. मात्र राजरोसपणे रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करुन  कमाई करणार्‍या फेरीवाल्यांवर का कारवाई केली जात नाही? कारवाई केली तरी हे फेरीवाले पुन्हा कसे स्थानकांत गाड्यांमध्ये व्यवसाय करतात. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट असते का, याची तपासणी का केली जात नाही, असा सवाल रेल्वे प्रवासी विचारत आहेत. मध्य रेल्वे याबाबत काही कारवाई करणार का, असाही प्रश्‍न आहे.