Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Sangli › अनोळखी तरुणीचा खून

अनोळखी तरुणीचा खून

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMनागज : वार्ताहर

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनातील पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे पंचवीस वर्षे वयाच्या अनोळखी तरुणीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही  घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

या महिलेचा मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. दरम्यान, रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या पत्र्याच्या शेडमध्ये ही महिला एका पुरुषाबरोबर वाद घालत होती. ती घटना आरेवाडी येथील पांडुरंग कोळेकर यांनी बघितली होती.तिच्यासोबत एक पाच वर्षांची मुलगीही होती.

त्या तरुणीबरोबर वाद घालणार्‍या  त्या पुरूषानेच तिचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. खून केल्यानंतर तो त्या चिमुरड्या मुलीसह पसार झाला असावा असा अंदाज आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आहेत.जवळच पडलेल्या पिशवीमध्ये मुलीची कपडे आहेत.

दरम्यान रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास  एक पुरूष, ती तरुणी  व  चिमुकली मुलगी   बिरोबा मंदिराच्या  परिसरात  फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे. त्या पुरुषाने आणलेल्या मोटारसायकलचा क्रमांक एकाने सांगितल्याने त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

मोटारसायकल  क्रमांकावरील सिरियल क्रमांक माहीत नसल्याने तपासात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्या महिलेची ओळख पटलेली नव्हती.   मारेकर्‍याचा शोध  लागलेला नव्हता. जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, कवठेमहांकाळचे  पोलिस  निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.