होमपेज › Sangli › उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एक ठार

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एक ठार

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 03 2017 11:45PM

बुकमार्क करा

सांगली/भिलवडी : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील औंदुबर येथे दत्तजयंतीनिमित्त दर्शनाहून परतणार्‍या दुचाकीवरील तीन तरूणांच्या अंगावर उसाची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला, अन्य दोघे जखमी झाले आहेत. प्रणव बाबासाहेब मगदूम (वय 21, रा. भिलवडी ता. पलूस) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.  

प्रसाद प्रदीप आडते (वय 21, रा. भिलवडी) व अवधूत नंदकुमार पाटील (वय 21, रा. माळवाडी) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रवण, प्रसाद व अवधूत तिघेही औदुंबरला गेले होते. दर्शनाहून ते परतत असताना अंकलखोप फाट्याजवळ ते आले असता उसाने भरलेली ट्रॉली (एमएच 10, डब्ल्यू 7671) पलटी झाली. यामध्ये ट्रॉली खाली तिघेही सापडले. याचवेळी रस्त्याशेजारी लावलेली एक मोपेडही या ट्रॉलीखाली सापडली तर एक दुचाकीस्वार ट्रॉलीला धडकून पडला. ही घटना घडल्यानंतर रस्त्यावरून जाणारे लोक तातडीने थांबले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

त्यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ऊस बाजुला करून तिघांनाही बाहेर काढले. दोन गंभीर जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले तर एकावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. या अपघातातील मृत प्रणव कोल्हापूर येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात त्याला दाखल केल्यानंतर तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.