Mon, Apr 22, 2019 04:24होमपेज › Sangli › ‘महालॅब’तर्फे दीडशे तपासण्या मोफत

‘महालॅब’तर्फे दीडशे तपासण्या मोफत

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 30 2018 9:06PMसांगली : गणेश कांबळे

केंद्रशासन व राज्य शासन यांच्या सहभागाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत येणार्‍या सर्व रुग्णांसाठी ‘महालॅब’ योजनेखाली अत्याधुनिक लॅबोरेटरी सुरू करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांगलीतील चैतन्य पार्क येथे ‘हिंदलॅब’ या नावाने ही लॅब सुरु आहे. या ठिकाणी 150 हूनअधिक  मोफत तपासण्या केल्या जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

अधिकृत पॅथॉलॉजिस्टविना चालणार्‍या सर्व लॅबवर बोगस डॉक्टर अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. साळुंखे यांनी दिला. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दै. ‘पुढारी’ने गेले दोन दिवस ‘रक्‍त तपासणी नव्हे, रक्‍त शोषण’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांना माहिती विचारली. ते म्हणाले, खासगी लॅबमार्फत तपासणीचे भरमसाठ दर आकारले जातात. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. यासाठी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत  येणार्‍या सर्व रुग्णांसाठी राज्यात महालॅब हा उपक्रम सुरू केला आहे.  29 सप्टेंबर 2016 मध्ये अध्यादेश  काढून सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक लॅब  सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र  शासनाची निशुल्क प्रयोगशाळा चाचण्या निदान योजना’ म्हणून राज्यात राबविली जाते. हिंद लॅब लाईफ केअर लि. या कंपनीकडे हे काम सोपविले आहे. 

बायोमेडिकल इक्‍विपमेंट, लॅबोरेटरी सर्व्हिस व टेलिरेडिओलॉजी सर्व्हिससाठी खर्चासही शासनाने मंजुरी दिली आहे.  यासाठी केंद्र शासन 60 टक्के व राज्य  शासनाचा 40 टक्के खर्चाचा हिस्सा असल्याचे  ते म्हणाले. 

येथील यशवंतनगर परिसरात चैतन्य पार्क हिंद लॅब या नावाने अत्याधुनिक लॅबोरेटरी सुरू केली आहे. या लॅबोरेटरीचे विभागीय व्यवस्थापक अवधूत तिपुगडे, महालॅबचे व्यवस्थापक एस. पी. झांबरे व लॅब व्यवस्थापक अमित आवळे म्हणाले, शासनाने गतवर्षी  जिल्ह्यासाठी तीन अत्याधुनिक लॅब सुरू केल्या.  मिरज, वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यांसाठी सांगली येथे, आटपाडी, जत व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी जत येथे व शिराळा, कडेगाव व खानापूर तालुक्यांसाठी कराड येथे अत्याधुनिक लॅब सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत रुग्णांची तपासणी करून नमुने एकत्रित करून ते तीन ठिकाणच्या लॅबमध्ये पाठविले जातात. त्या ठिकाणी  अत्याधुनिक यंत्र व तज्ज्ञांमार्फत त्याची तपासणी केली जाते. या लॅबसाठी एम. डी. पॅथॉलॉजिष्ट म्हणून डॉ. वैभव माने यांची नियुक्‍ती केली आहे. त्यानंतर सर्व रिपोर्ट ऑनलाईन त्या- त्या आरोग्य केंद्रांकडे पाठविले जातात. यासाठी लॅबोरेटरीमध्ये रनर, प्लेबोटॉमीस, लॅब इन्चार्ज, टेक्निशियन, अ‍ॅडिशनल प्लेबोटॉमिस, डिस्ट्रीक्ट को-ऑर्डिनेटर हे लक्ष ठेवून असतात. एम. डी. पॅथॉलॉजिस्टमार्फत  तपासणी करून रिपोर्ट देण्यात येतात. ही सर्व तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते. 

कॅन्सर व काही महत्त्वाच्या तपासण्या या मुंबई येथील लॅबमध्ये पाठवून रिपोर्ट मागवून घेतले जातात. जिल्ह्यातील तिन्ही लॅबमध्ये दररोज 600 ते 700 तपासण्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 685 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. 

शासनाच्या महालॅबमार्फत करण्यात येणार्‍या मोफत तपासण्या

 प्लेटलेट्स काऊंट, ब्लड काऊंट, प्रोथोम्बिन टाईम टेस्ट. 
 बायोकेमेस्ट्री :  ब्लड युरिया, एस. क्रियेटिन, एस. बिलीरुबीन (टी, डी), एसजीओटी, एसजीपीटी, एस. अल्कालाईन फॉस्पेट्स, एस. टी. प्रोटीन, एस. अ‍ॅल्बुमीन, टोटल कोलेस्ट्रॉल, एस. ट्रायग्लिसराईड, एस. व्हीएलडीएल, एस. एचडीएल, एस. अ‍ॅमेलिस, एस. कॅल्शिअम, एस. सोडीयम, एलडीएच, युरिक अ‍ॅसिड, पोटॅशिअम, युरिन रुटिन, युरिन मायक्रोपॅथी, स्टूल फॉर रुटीन मायक्रो अँड ओव्हीए.हे :कंम्पलेट ब्लड काऊंट, पेरीफेअरल ब्लड, टोटल इसोनोफिल काऊंट, कोम्बस् टेस्ट, मलेरिया पॅरॉसाईट, प्रोथ्रोम्बीन टाईम टेस्ट (आयएनआर), 
 सेरेलॉजी :  रेयूमॉटॉईड फॅक्टर, एएसएलओ, एचबी एजी, सीआरपी, टीएचटी, टी3,टी4.
 बायोकेमेस्ट्री अँड इम्युनोसरी :  टोटल प्रोटीन, अ‍ॅल्बुमीन, कॅल्शिअम, एलडीएच, युरिक अ‍ॅसिड, एचबीएआयसी, एचपीएलसी, ऑनिक कॅल्शिअम, सीबीकेटी, सीबीकेएमबी, एएसएलओ, एचपीएलसी.
 क्‍लिनिकल पॅथॉलॉजी :  स्टूल फॉर ओाव अँड सीस्ट, फ्लूड सेल काऊंट, 
 बायोकेमिस्ट्री :  सीमेन अ‍ॅनॅलिसेस स्पर्म, इम्युनोअ‍ॅसेस, थॉयरॉड टोटल, टेस्टोस्टिरॉन, प्रोजेस्टिरॉन, हायड्रोप्रोजेस्टिरॉन, प्रोलॅक्टीन, एएमएच, पीएसए, एफएसएच, इस्ट्रॉडॉल, एलएच. 
 मायक्रोबॉयोलॉजी :  ब्लड काऊंट, ग्रेमस्टेनिंग, कल्चर्स, स्पुटियम, 35 अँटीबायोटिक सेन्सेटीव्हीटी टेस्ट, कॅन्सर मेकर टेस्ट, ट्यूमर मेकर टेस्ट, इलेक्ट्रॉफोरिसीस टेस्ट. 
 पॅथॉलॉजी : हिस्टोपॅथॉलॉजी, कायटॉलॉजी, बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन, टॉर्च. 

महापालिका क्षेत्रासाठीही मोफत सुविधा आवश्यक

शासनामार्फत महालॅबची सुविधा ही ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही योजना राबवली जात असताना सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्र यातून वगळण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातही  गरीब रुग्ण आहेत. खासगी लॅबच्या माध्यमातून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांनाही योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी  आहे.