Wed, Mar 27, 2019 04:38होमपेज › Sangli › बेकायदा विद्यार्थी वाहतूक : ७४ वाहने जप्त

बेकायदा विद्यार्थी वाहतूक : ७४ वाहने जप्त

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:03AMसांगली : प्रतिनिधी

विनापरवाना तसेच बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणारी 74 वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये 33 रिक्षा, 40 व्हॅन, एक स्कूल बसचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चोकाकजवळ झालेल्या स्कूल बसच्या अपघातानंतर सांगली आणि मिरजेत बुधवारी सकाळपासून या कारवाईला प्रारंभ झाला. पोलिसांची वाहतूक शाखा आणि आरटीओ कार्यालय यांच्या वतीने  ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी पत्रकारांना सांगितले. 

चोकाकजवळ स्कूल बस आणि कंटेनरच्या अपघातात तीन ठार झाल्यानंतर पोलिस आणि आरटीओ कार्यालयाने विनापरवाना आणि बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आरटीओ विलास कांबळे यांनी संबंधितांना अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संयुक्‍त पथकाला दिले आहेत. 

अधीक्षक शर्मा, कांबळे यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम, अभिजित देशमुख, आरटीओ निरीक्षक संदीप पाटील, शंभुराजे पवार यांच्या संयुक्‍त पथकाने बुधवारी सकाळपासून बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली. एकूण 74 वाहने जप्त केली. या वाहनांचे विद्यार्थी वाहतुकीच्या परवान्यासह पासिंग व  कागदपत्रे तपासण्याचे काम संयुक्‍त पथक करीत आहे. 

कारवाईत सातत्य ठेवणार...

ज्या वाहनांच्या कागदपत्रे, परवान्यांमध्ये त्रुटी आहे,अशा वाहनांना मेमो देण्यासही सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारपर्यंत 24 वाहनधारकांना मेमो दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोच केल्यानंतरच ही कारवाई सुरू केली. याबाबत प्रत्येक शाळांना सूचना दिल्या आहेत. शिवाय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनमालक आणि चालकांनाही सूचना दिल्या आहेत. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी सांगितले. 

रिक्षा संघटनांची पथकाशी चर्चा

दरम्यान, यावेळी सांगली आणि मिरज शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या संयुक्‍त शिष्टमंडळाने पथकातील अधिकार्‍यांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मात्र, कागदपत्रे तसेच परवाना नसलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यावर ठाम असल्याचे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले. महादेव पवार, फिरोज मुल्ला यांच्यासह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

परवान्यासाठी वेळ द्या...

दरम्यान, व्हॅनचालक, मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीही पथकातील अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. परवाना नसलेल्या व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. यावेळी पदाधिकार्‍यांनी परवाने घेण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणीही केली.