Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यात बेसुमार वाळू उपसा

तासगाव तालुक्यात बेसुमार वाळू उपसा

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:31PMतासगाव : प्रतिनिधी 

तासगाव तालुक्यातील येरळा आणि अग्रणी पात्रालगतच्या गावातील काही  नेतेच वाळूतस्कर बनले आहेत. दिवसाढवळ्या काळ्या सोन्याची बेसुमार लूट सुरू आहेत. त्यामुळे नदीपात्रांची चाळण झाली आहे. तालुक्याच्या हद्दीतून येरळा आणि अग्रणी या दोन नद्या वाहतात. या नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आहे. या नद्यापात्रांच्या लगत असलेल्या गावांतील काही स्थानिक नेते रात्रीच्यावेळी जेसीबीनेे वाळू उपसा करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बिनदिक्कत सुरू आहे. यामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी दहा फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. 

अनेक गावांत काही  स्थानिक कार्यकर्तेच  वाळू तस्करी करीत आहेत. शासकीय कामाच्या नावाखाली नदीतील वाळूवर डल्ला मारत आहेत. गावपातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी वाईटपणा नको म्हणून याकडे कानाडोळा  करतात. मग एक सदस्य वाळू उचलतो म्हणून दुसराही  तेच करत आहे, असे एक एक करत  अनेकजण  वाळूतस्कर बनले आहेत.  काही गावांमध्ये वाळू तस्करी करणार्‍यांच्या टोळ्या तयार झाल्या. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस गावपातळीवर काम करणार्‍या महसूल प्रशासनात नाही.तहसीलदार सुधाकर भोसले यांनी बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या  अवैध वाळू तस्करीला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण तालुक्याच्या हद्दीतील काळे सोने  मात्र लुटले जात आहे. तहसीलदार भोसले यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि बेसुमार वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

लोढे तलावही वाळू तस्करांसाठी सोन्याची खाणच झाली आहे. याठिकाणी गेल्या अनेक वषार्ंपासून बेसुमार  वाळू चोरी सुरू  आहे.  याविरोधात महसूल विभागाने अनेकवेळा कारवाईचा बडगाही उगारला आहे. मात्र मुजोर झालेले वाळू तस्कर प्रशासनाच्या कारवाईला जुमानत नाहीत. त्यामुळे बर्‍याचवेळा कारवाई होऊनही या तलावातील  वाळूची चोरी सुरूच आहे.

वाळू चोरीसाठी असाही फंडा....!

शहरातील वाळू तस्करांनी वाळू चोरीसाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. कारवाईपासून  वाचण्यासाठी काही बहाद्दरांनी सिमेंटच्या पोत्यात वाळू भरुन चक्क चारचाकी गाडीतून तस्करी सुरू केली आहे. तस्करांच्या या फंड्यामुळे महसूलच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे.