Sun, Apr 21, 2019 04:12होमपेज › Sangli › उमराणीच्या विजयी रणसंग्रामाचे स्मारक उपेक्षित

उमराणीच्या विजयी रणसंग्रामाचे स्मारक उपेक्षित

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:40PMसांगली : उध्दव पाटील

मराठेशाहीच्या इतिहासात जत तालुक्यातील उमराणीचा रणसंग्राम अतिशय दैदिप्यमान आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अव्वल युध्दनीतीचा अवलंब करत संख्येने प्रचंड असलेल्या आदिलशाही सैन्याचा दारूण पराभव केला होता. हा विजयी इतिहास जपण्यासाठी उमराणी येथे प्रतापरावांचे स्मारक व विजयीस्तंभ उभारण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सन 2002 मध्ये केला होता. सोळा वर्षे सरली तरीही हे स्मारक अर्धवट स्थितीत आहे. माहितीचा साधा फलकही नाही. स्मारक म्हणून केलेले बांधकाम ऐतिहासिक पध्दतीचे तर मुळीच नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन 1673 मध्ये पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर आदिलशहाने प्रचंड फौज, हत्ती, घोडे यांच्या मोठ्या लवाजम्यासह बेहलोलखान या सरदाराला पन्हाळ्याच्या मोहिमेवर पाठविले होते. तिकोट्यामार्गे बेहलोलखानाचे सैन्य उमराणी येथे आले. पुढे या सैन्याला मोगलांची कुमक मिळणार होती. तत्पूर्वीच आदिलशाहच्या रणनीतीला सुरूंग लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना उमराणीच्या मोहिमेवर पाठविले. प्रतापराव गुजर व मराठे सैन्यांनी मोठा पराक्रम केला. आदिलशाही सैन्याचा नामुष्कीजनक पराभव केला. बेहलोलखानाने शरण येत प्रतापरावांपुढे गुडघे टेकत प्राणदानाची याचना केली. प्रतापरावांनी खानाला सोडून दिले होते. पण हाच खान पुढे 1674 मध्ये पुन्हा स्वराज्यावर चालून आला. कृतघ्न बेहलोलखानाला कायमचा संपविण्यासाठी प्रतापराव त्वेषाने पेटून उठले. नेसरी (ता. गडहिंग्लज) जवळ बेहलोलखान येत असल्याचे कळताच प्रतापराव केवळ सहा साथीदारांसह चाल करून गेले. खानाच्या सैन्याबरोबर बरीच हातघाई झाली आणि प्रतापरावांसह सातही जण धारातिर्थी पडले.  नेसरी येथे प्रतापरावांचे भव्य स्मारक उभारले आहे.

मात्र उमराणी येथे त्यांनी केलेल्या पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास मात्र दुर्लक्षित आहे. या विजयी रणसंग्रामाचे स्मारक उभारण्याचा निर्णय सांगली जिल्हा परिषदेने 2002 मध्ये घेतला होता. तत्कालीन सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी स्मारकाची कल्पना आणि ठराव मांडला होता. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे आणि सभापती रवींद्र बर्डे यांनी पाठपुरावा केला. जिल्हा परिषद स्वीय निधीच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली. मात्र स्वीय निधीचे बजेट तोकडे असल्याने निधीही तोकडाच होता. त्यामुळे स्मारकाला साजेसे काम झाले नाही.  प्रतापरावांचे स्मारक म्हणजे केवळ षटकोनी आकाराची खोली अशा पध्दतीचे बांधकाम आहे. विजयीस्तंभ उभारला आहे.

मात्र स्मारक आणि विजयीस्तंभाचे बांधकाम ऐतिहासिक पध्दतीचे नाही. केवळ काम उरकण्याचा प्रकार दिसून येतो. पायरीच्या फरशा उखडल्या आहेत. ही वास्तू अथवा हे स्मारक कशाचे आहे याबाबतच्या माहितीचा फलकही इथे दिसत नाही. उमराणीचा रणसंग्राम, सरसेनापती प्रतापरावांचा पराक्रम व त्यांचा जीवन परिचय करून देणारी शिल्पसृष्टी साकारणे आवश्यक आहे. या स्मारकाचे काम ऐतिहासिक पद्धतीचे व आकर्षक होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडून भरीव तरतूद आवश्यक आहे.