Wed, Nov 21, 2018 19:21होमपेज › Sangli › शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा

शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कडेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी कडेगावला धावती भेट दिली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे कडेगाव येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप सरकारचा शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. 

यावेळी ठाकरे म्हणाले, आमदार डॉ. पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना साथ द्यायला सांगा मग पाठिंबा काढून घेऊ, असे बोलून  काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीलाही दाद दिली. या काही क्षणांच्या चर्चेनेही राजकीय जानकारांच्या भुवया उंचावल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वागताने उद्धव ठाकरे भारावून गेल्याचे दिसले. या सर्व प्रकारामुळे भविष्यात राजकीय बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

यावेळी माजी जिल्हा परिषदचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच राहुल साळुंखे, कडेगाव नगरपंचायतीचे  उपनगराध्यक्ष साजिद पाटील, सुरेश देशमुख, माजी सरपंच विजय शिंदे, नगरसेवक सागर सूर्यवंशी, सुनील जगदाळे, कमलाकर चौगुले, दत्तात्रय भोसले, आनंदराव डांगे, संजय कदम, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते .

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे  कडेगाव तालुक्यातील शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते, मुकुंद कुलकर्णी, सुनील मोहिते, राहुल चन्ने उपस्थित होते.