Thu, Apr 25, 2019 15:36होमपेज › Sangli › आंब्याजवळ अपघातात सांगलीचे दोन तरुण ठार

आंब्याजवळ अपघातात सांगलीचे दोन तरुण ठार

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 11:46PMमलकापूर/सांगली : प्रतिनिधी

आंबा-विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडी येथील नागमोडी वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात धोंडिराम तुकाराम शेजूळ (वय 25) व राहुल दिगंबर कांबळे (24, दोघेही रा. विश्रामबाग, सांगली) हे महाविद्यालयीन तरुण ठार झाले. हा ईंपघात सोमवारी दुपारी दोन वाजता घडला.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राहुल व धोंडिराम हे दोघेजण मित्रांसमवेत किल्ले विशाळगड येथील मलिकरेहान बाबांच्या दर्शनास मोटारसायकलवरून सकाळी नऊ वाजता विश्रामबाग (सांगली) येथून निघाले होते. दरम्यान, दुपारी दोन वाजता आंबा-विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडी गावाजवळील चक्री वळणावरून विशाळगडहून-आंब्याकडे निघालेल्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक धोंडिराम तुकाराम शेजूळ हा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला, तर मागे बसलेला राहुल दिगंबर कांबळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास आंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, त्याचाही मृत्यू झाला.

राहुल व धोंडिराम या दोघांसह अन्य चौघे जण तीन मोटारसायकलवरून, तर अन्य दहा जण अ‍ॅपे रिक्षातून देवदर्शनासाठी निघाले होते. आंब्याहून ते विशाळगडला निघाले असता वाघझर्‍यावर विश्रांतीसाठी थांबून पुढे निघाले असता, हा अपघात घडला. अपघातस्थळावरून पळून जाणारा चालक सुरेश भोजे (रा. करजारी, जि. रत्नागिरी) यास त्यांच्यासमवेत असणार्‍या मित्रांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आपल्या मित्रांचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहून, इतर मित्रांचे डोळे पाणावले होते.

मृत धोंडिरामचे वडील हमाली करून आपल्या मुलाला शिकवत होते. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. तर राहुलचे वडील मुंबईत पोलिस आहेत. त्याला एक भाऊ, एक बहीण आहे. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत खासगी कंपनीत नोकरी करत होते. कुटुंबाचा आधार देणारी मुले काळाने हिरावून घेतल्याने आई-वडील व नातेवाईकांतून हळहळ व्यक्‍त हो होती. कांबळे व शेजूळ कुटुंबावर शोककळा पसरली होती. 

सांगलीत अष्टविनायकनगरमध्ये शोककळा

विशाळगड येथे सहलीसाठी जात असताना सतरा जणांच्या ग्रुपमधील राहुल दिगंबर कांबळे  आणि धोंडीराम तुकाराम शेजूळ  या दोन तरुणांचा मलकापूर (जि. कोल्हापूर) येथे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील अष्टविनायकनगरमध्ये शोककळा पसरली. दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक विष्णू माने यांच्यासह अष्टविनायकनगर परिसरातील कार्यकर्त्यांनी मलकापूर येथे धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह येथे आणण्यात आले. 

येथील अष्टविनायकनगरमध्ये लायन्सग्रुप हा तरुणांचा ग्रुप आहे. यातील बहुसंख्यजण विविध प्रकारची कामे करीत पोलिस   आणि मिल्ट्री भरतीची तयारी करतात. सकाळ- संध्याकाळ  यातील बहुसंख्यजण एकत्र असतात. काहीजण भरतीही झाले आहेत. नोकरी मिळालेले मित्र नुकतेच येथे आलेले होते. बुधवारी गोव्याला जायचे सर्वांचे ठरले होते. मात्र आज सकाळी अचानक विशाळगड येथे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार तीन दुचाकीआणि एका कारमधून सर्वजण विशाळगडला गेले. राहुल आणि धोंडीराम एका दुचाकीवर बसले होते. मलकापूरजवळ झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.