Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Sangli › कामे करायची नसतील नोकरी सोडा

कामे करायची नसतील नोकरी सोडा

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 10:49PMसांगली : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली कामे अद्याप झालेली नाहीत. तुम्हाला कामे करायची नसतील तर नोकरीत राहू नका. निवांत घरी थांबा, अशा शब्दात  जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी शुक्रवारी जलयुक्‍त शिवारच्या बैठकीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चांगलेच खडसावत धारेवर धरले. मार्चअखेर कामे न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते. 

जलयुक्‍त शिवार योजनेसाठी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.  मात्र दोन वषार्ंपूर्वीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौर्‍यावर असताना त्यांनीही हा मुद्दा उपस्थितीत करीत खडसावले होते. दुसरे वर्ष संपत आले तरी 247 कामे सुरू असल्याचे आज अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी पाटील यांनी दि. 31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

पाटील म्हणाले, या वर्षीसाठी   7 हजार 951 कामांचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी 99 कोटींच्या 7 हजार 388 कामांना मान्यता देण्यात आली.  यातील 1 हजार 491 कामे पूर्ण झाली आहेत. बाकी कामे मेपर्यंत  पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कामनिहाय आढावा घेण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ते म्हणाले, पाणी फाउंडेशन उपक्रमात अधिकारी, कर्मचार्‍यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. आठ एप्रिलपर्यंत त्याबाबत आरखडा करण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक तेथे पथक पाठवण्यास सांगण्यात आले आहे. शेततळ्यासाठी 16 हजार 225 अर्ज आले होते. त्यापैक 3 हजार 347 शेततळी पूर्ण झाली आहेत. अजून 1 हजार 743 शेततळ्यांना तीन दिवसात मंजुरी देण्यास सांगण्यात आले आहे. 

Tags : Sangli, Sangli News, Two years ago, approved works, were not completed yet.