Tue, Jun 25, 2019 21:52



होमपेज › Sangli › सांगलीत दोन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सांगलीत दोन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 10:53PM



सांगली : प्रतिनिधी

येथील पोलिस मुख्यालयातील अधीक्षक कार्यालयाजवळ दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथील महिला पोलिसांनी त्यांना तातडीने अडवून ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. मिरज पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने कृत्य केल्याचे पीडित महिलांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, त्या दोघींवरही आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

मुमताज असिफ शेख (वय 40), अमिना मेहबूब सुभानी घटकर (वय 40, दोघीही रा. ख्वाजा वस्ती, मिरज) अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या महिलांची नावे आहेत. या दोघींसह एक युवती व तीन लहान मुले सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील अधीक्षक कार्यालयाच्या पिछाडीस आली. तेथे त्यांनी तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप करीत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेतले. 

ही घटना लक्षात येताच कर्तव्य बजावत असणार्‍या महिला पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. दोघींनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील आगपेटी काढून घेतली. दोघींनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

मुमताज शेख म्हणाल्या, मिरजेतील ख्वाजा वस्तीत एका महिलेचा दारू तसेच गांजा विक्रीचा व्यवसाय आहे. ती चोरून दारू विक्री करीत असल्याची माहितीही  पोलिसांना आहे. तिच्या गुत्त्यावर येणार्‍या तळीरामांचा त्रास होत असल्याने तिच्याकडे व्यवसाय बंद करण्याची मागणी आम्ही केली होती. 

मात्र, तिने त्यावेळी तिच्या समर्थकांना पाठवून आम्हालाच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्याकडे तक्रार केल्याच्या रागातून त्या महिलेसह तिच्या मुलांनी मंगळवारी घरात घुसून तोडफोड केली. त्याशिवाय काचाही फोडल्या आहेत. याबाबत तक्रार देण्यासाठी आम्ही दोघीही मंगळवारी दिवसभर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात बसून होतो. 

मात्र पोलिसांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाची कोणतीच दखल घेतली नाही. पोलिस अधीक्षकांनी सांगूनही मिरजेतील पोलिसांनी  संबंधित महिलेवर कोणतीही कारवाई केली नाही. आमच्यावरील अन्यायाची दखल घेतली न गेल्यानेच आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे मुमताज शेख यांनी यावेळी सांगितले.