Sun, May 19, 2019 14:10
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › रेल्वेखाली दोघांची आत्महत्या

रेल्वेखाली दोघांची आत्महत्या

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:21AMसांगली : प्रतिनिधी

शहरात शुक्रवारी रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. कलानगर येथील रेल्वे पुलाजवळ एक घटना घडली; तर विश्रामबाग रेल्वे स्थानकापासून पूर्वेला दोनशे मीटर अंतरावर दुसरी घटना घडली. याबाबत सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

दीपक स्वपन मल (वय 20, रा. दक्षिण भटोरा, हावडा, पश्‍चिम बंगाल), गणेश अशोक मगदूम (30, रा. इंदिरा हाऊसिंग सोसायटी, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत. दीपक मलचा मृतदेह कलानगर येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ असल्याची माहिती शहर पोलिसांना रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी सकाळी पावणेसातच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी दीपकच्या धडाचे दोन तुकडे झाल्याचे निदर्शनास आले. त्याने त्याची बॅग रूळाकडेला व्यवस्थित ठेवली होती. 

त्यामध्ये त्याचे कपडे आणि आधारकार्ड सापडले. त्यावरून त्याची ओळख पटविण्यात आली. मात्र तो सांगलीत कोणाकडे आला होता किंवा येथे कामाला होता का याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबत पश्‍चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, दुसर्‍या घटनेत गणेश मगदूम हा आई, वडील, पत्नी, मुलगा यांच्यासमवेत कुपवाड येथील गोमटेशनगर येथे राहतो. तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. रात्री पावणेदहाच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला दोनशे मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत रात्री उशिरा रेल्वे पोलिसांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

गणेश मगदूमची आत्महत्याच

दरम्यान गणेश मगदूमचा घातपात केल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. मात्र त्याला रेल्वेखाली उडी मारताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा घातपात झाला नसून त्याने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट आहे असे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

Tags : sangli, Two suicides, under train, sangli news,