Mon, Jun 24, 2019 16:52होमपेज › Sangli › एसटी बसच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी

एसटी बसच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

कवलापूर-तासगाव रस्त्यावर कोष्टी मळ्याजवळ भरधाव एस.टी. बसने धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. राजेंद्र मुताप्पा गौरगोंड (वय 19, रा. कवलापूर) व त्याचा मावस भाऊ जखमी झाले. रविवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर बस एका द्राक्षबागेत घुसली. याची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

राजेंद्र कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ रहातो. रविवारी घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने तो मोटारसायकलवरून (एमएच 10 सीझेड 8702) मावस भावाला घेऊन कवलापुरात साहित्य खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर दोघेही घरी निघाले होते. कोष्टी मळ्याजवळ आल्यानंतर विट्याहून सांगलीला जाणार्‍या बसने (एमएच 14 बीटी 0958) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. दोघेही उडून पडले. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जाऊन द्राक्षबागेत घुसली. बसमधील प्रवाशांना मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर दोघाही जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.