Thu, Jul 18, 2019 10:22होमपेज › Sangli › सांगलीत एका रात्रीत दोघांवर खुनी हल्ला

सांगलीत एका रात्रीत दोघांवर खुनी हल्ला

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:49PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील धामणी रस्ता परिसरात  दारू पीत असताना झालेल्या वादातून एकावर कुर्‍हाड आणि तलवारीने खुनी हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर उर्मिलानगर येथे पूर्वीच्या भांडणाच्या रागातून एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. 

धामणी रस्ता परिसरातील घटनेत किरण नेताजी कलकुटगी (वय 21, रा. बालहनुमान वडर कॉलनी) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गणेश माळगे, जावेद नदाफ, पिंटू गोडबोले (पूर्ण नाव नाही) व तीन अनोळखींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किरणचा धनंजय गवळी मित्र आहे.  किरणने गणेशला तू धनंजय गवळीला ओळखत नाहीस का, असे विचारले होते. तसेच किरण धनंजयसोबत फिरत असल्याचा राग माळगेच्या मनात होता. त्यानंतर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास किरण या सर्व संशयितांसोबत  दारू पिण्यासाठी गेला होता.

त्यावेळी त्यांच्यात धनंजय गवळीबाबत पुन्हा विषय काढला. त्याच्यासोबत फिरू नको, असे सांगत किरणला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर पिंटू गोडबोले, जावेद नदाफने किरणच्या डाव्या पायावर तलवारीने जोरदार वार केला. यावेळी अन्य संशयितांनाही कुर्‍हाडीने त्याच्यावर वार केले. यामध्ये किरण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उर्मिलानगर परिसरात घडलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरूख रूस्तम नदाफ (वय 19, रा. इंदिरानगर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अमन खाजा मोकाशी (वय 16, रा. बावडेकर कॉम्प्लेक्सच्या मागे, शिंदे मळा) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शाहरूखसह दोघांविरोधात  खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमन व शाहरूख दोघेही मित्र आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये नशेत वाद झाला होता. त्या वादातून हा हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास उर्मिलानगरमधील एका कार्यालयासमोर अमन मित्रासोबत बोलत उभा राहिला होता. त्यावेळी शाहरूख आणखी एका सोबत तेथे आला. त्यावेळी त्याने पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारत अमनवर चाकूने वार केला. 

यामध्ये अमन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या खुनी हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.