Mon, Apr 22, 2019 16:14होमपेज › Sangli › आणखी दोन ब्रदरवर कारवाई होणार

आणखी दोन ब्रदरवर कारवाई होणार

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 11:17PMसांगली : प्रतिनिधी

उपचार सुरू असताना मृत झालेली व्यक्ती तुमचीच आहे असे सांगून दुसर्‍याचाच मृतदेह नातेवाईकांना दिल्या प्रकरणी आणखी दोन ब्रदरवर कारवाई होणार  आहे. त्याशिवाय न्यायालयाची परवानगी घेऊन बागवडे यांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात येणार आहेत. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. उगाणे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा  सादर झाला .  तासगावचे अविनाश बागवडे यांना अकरा दिवसांपूर्वी  सांगली सिव्हीलमध्ये दाखल केले होते.  मंगळवारी रात्री त्यांना संसर्गजन्य कक्षात हलविण्यात आलेे. त्यांच्यासोबत आणखी एक रूग्णही त्याच कक्षात हलविण्यात आला होता. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास दुसर्‍या रूग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पीटलकडून बागवडे यांच्या नातेवाईकांना   कळविण्यात आले.  

बागवडे यांचा बंधू, पुतण्या सिव्हीलमध्ये आले. त्यांनी उत्तरीय तपासणी केंद्रात मृतदेह पाहून तो अविनाश यांचा नसल्याचे सांगितले. तरीही त्यांना घाई गडबडीत मृतदेह सोपविण्यात आला.   मृत्यूचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र तासगावमध्ये मृतदेह नेल्यानंतर तो बागवडे यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बागवडे यांच्या नातेवाईकांनी दुसर्‍याचा मृतदेह परत करून सिव्हील प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर   तातडीने डॉ. उगाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन ब्रदर दोषी आढळल्याने त्यांची मिरजेला तडकाफडकी बदली करण्यात आली.  

चौकशी अहवालाबाबत डॉ. उगाणे म्हणाले, या प्रकरणाबाबत आताच अंतीम निर्ष्कषाला येता येणार नाही. आम्ही केलेल्या चौकशीचा अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला.दरम्यान मिरज शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, जिवंत व्यक्तीला मृत ठरवणे हा गंभीर प्रकार आहे.  अहवाल पाहिल्यानंतर  जे कोणी दोषी आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

दलित महासंघाचा आज तिरडी मोर्चा

सिव्हिलचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे निलंबन या मागणीसाठी  दलित महासंघातर्फे उद्या(दि. 22) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सिव्हिल हॉस्पीटल या मार्गावर दुपारी 12 वाजता तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे निवेदन संघाचे उपाध्यक्ष दिलीप शेलार यांनी काढले आहे. 

कर्मचार्‍यांना बळीचा बकरा करू नयेः मोरे

जिवंत व्यक्तीला मृत ठरवलेल्या प्रकराणात केवळ ब्रदरला दोषी ठरवून बळीचा बकरा करता येणार नाही. या प्रकराणीच सखोल चौकशी करुन यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात डॉक्टर आणि पोलिसांची चौकशी होणे आवश्यक आहे.