Tue, Nov 20, 2018 03:17होमपेज › Sangli › कंटेनरच्या धडकेत कामेरीजवळ दोन ठार

कंटेनरच्या धडकेत कामेरीजवळ दोन ठार

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 04 2018 12:05AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

पुणे-बेेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) नजीक भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दोन युवक ठार झाले.  हा अपघात शनिवारी रात्री घडला. अमोल संजय पाटील (वय 31), हर्षल हंबीरराव कांबळे (वय 19, दोघेही रा. इस्लामपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कंटेनर चालक सुनील भानुदास वाघमोडे (वय 35, रा. हुन्नर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमोल पाटील हा पुणे येथील खासगी कंपनीत नोकरीस आहे. सुट्टीसाठी शनिवारी पुणे येथून चारचाकी गाडीने घरी येत होता. रात्री पेठनाका येथे तो उतरला. दरम्यान, त्या चारचाकी गाडीमध्ये अमोलला त्याचा मोबाईल विसरल्याचे लक्षात आले. त्याने मित्राच्या मोबाईलवरून रिंग केली. चारचाकीतील चालकाने तुमचा मोबाईल गाडीत आहे, मी कामेरीजवळ थांबतो. तो घेवून जावा, असे सांगितले.  

अमोल त्याच्या घराशेजारी राहणारा मित्र हर्षल हंबीरराव कांबळे याला मोटारसायकल (एम.एच.10/आर-1411) वरून घेवून गेला. कामेरीनजीक चारचाकी (क्र. जे.एच.-01/सीक्यू-8047) ही रस्त्यावर थांबली होती. मोटारीपासून  काही फुटाच्या अंतरावर दुचाकी असताना कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेत दोघेजण रस्त्यावर फरफटत गेले. दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघेही ठार झाले.  

दोघांच्या मृतदेहाची येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अमोलचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. ते दोघेही शहरातील एका संघटनेशी संबंधित असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता. शास्त्रीनगर परिसरातील त्यांच्या घरी मित्रांनी मोठी गर्दी केली होती. महंमद सादीक सय्यद सुलतान यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली. कंटेनर चालक सुनील वाघमोडे याला रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.