Thu, Jul 18, 2019 04:04होमपेज › Sangli › दोन बंद घरे, फ्लॅट फोडला

दोन बंद घरे, फ्लॅट फोडला

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 11:56PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील दोन बंद घरे तसेच सांगलीतील कत्तलखान्याजवळील एक बंद फ्लॅट फोडण्यात आला. तसेच माधवनगरमधील एक कारखाना फोडून चोरट्यांनी यंत्रे आणि त्याचे साहित्य लंपास केले. चारही ठिकाणी मिळून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कत्तलखान्याजवळील फ्लॅट फोडल्याप्रकरणी मात्र शहर पोलिस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. 

संजयनगर येथील सह्याद्रीनगरमधील इरफान हारूण पोची (वय 39) मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घराला कुलूप लावून परगावी गेले होते. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. 

आतील खोलीत ठेवलेले लोखंडी कपाट फोडून त्यातील 57 हजारांची रोकड, सोन्याचा सेट, 6 लहान मुलांच्या अंगठ्या, कर्णफुले, तीन जोड चांदीचे पैंजण, चांदीची वाटी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला.  संजयनगरमधीलच सचिन कुमार पाटील (वय 30) गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराला कुलूप लावून परगावी गेले होते. रात्री साडेसातच्या सुमारास ते परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.  कपाट फोडून  11 हजार पाचशे रूपये रोख, 35 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, चेन असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला.

माधवनगर येथील रविवार पेठेत बिरदीलाल मनालाल बेदमुथा (वय 65) यांचा कारखाना आहे. गुरुवारी सायंकाळी ते कारखाना बंद करून घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कारखान्याच्या पिछाडीचा लाकडी दरवाजा तोडून  सुमारे पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

सांगलीत बंद फ्लॅट फोडला; पण...

दरम्यान, शुक्रवारी दुपारी शहरातील कत्तलखान्याजवळील पी. आर. पाटील मार्गावर असलेल्या चंदाराणी अपार्टमेंटमधील एक बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. जगन्‍नाथ  सुतार दुपारी एका कामासाठी फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. साडेतीनच्या सुमारास ते परतल्यानंतर घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य विसकटले होते; मात्र सुतार यांनी घरात रोकड अथवा दागिने ठेवले नव्हते. त्यामुळे काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.