Sun, Nov 18, 2018 22:19



होमपेज › Sangli › अडीच लाख शेतकर्‍यांना वीजकनेक्शन मिळणार

अडीच लाख शेतकर्‍यांना वीजकनेक्शन मिळणार

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:14AM



सांगली : प्रतिनिधी

राज्यात मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित असणार्‍या 2 लाख 49 हजार 358 शेतकर्‍यांना उच्चदाब वीज  वितरण प्रणालीव्दारे वीजजोडणी देण्यात येणार आहे. कृषीपंपांच्या वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांपैकी 1 लाख 65 हजार 456 शेतकर्‍यांनी  मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. उर्वरित 83 हजार 902 शेतकर्‍यांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणव्दारे सर्वच प्रकारच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी, बिल व  भरणा, वीज स्थगितीची सूचना, मीटर  रिडींग इत्यादीचे एसएमएस ग्राहकांना पाठविण्यात येतात. महावितरणने कृषीपंपाना उच्चदाब वीज  वितरण  प्रणालीव्दारे वीजजोडणी देण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.  ती अंतिम टप्प्यात आहे. सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार राज्यातील 40 लाख 68 हजार 220 कृषीपंपांना वीजजोडण्या दिलेल्या आहेत. कृषीपंपांसाठी मोठ्या  प्रमाणात विजेचा वापर करण्यात येतो. या पध्दतीमुळे एकाच रोहित्रावरून 15 ते 20 कृषी पंपांना वीजपुरवठा करण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीची लांबी वाढते. यामुळे कृषीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा मिळणे, रोहित्र वारंवार बिघडणे, पुरवठा खंडित होणे, वीजहानी वाढणे,  आकडे टाकून वीजचोरी करणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व अडचणींना कायमचे सोडवून राज्यातील शेतकर्‍यांना चांगल्या दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी या प्रणालीव्दारे कृषीपंपाच्या जागेपर्यंत उच्चदाब वाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यांच्या वीजभारानुसार विविध क्षमतेचे (10,16 किंवा 25 एव्हीए) रोहित्र उभारण्यात येणार आहेत. या रोहित्रावरून एक किंवा दोन शेतकर्‍यांनाच वीजजोडणी दिली जाणार असल्यामुळे या प्रणालीचा  शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.   या प्रणालीतील कामे कोणत्या टप्प्यात आहेत तसेच कृषीपंपाना वीजजोडणी देण्याबाबतची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती शेतकर्‍यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल.