Fri, Nov 16, 2018 20:14



होमपेज › Sangli › पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात?; आणखी दोघांना अटक

पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात?

Published On: Sep 01 2018 2:15PM | Last Updated: Sep 01 2018 2:15PM



सांगली : प्रतिनिधी

शहरातील बसस्थानकाजवळील एका दुकानात बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीची  व्याप्ती राज्यभर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांना आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी ऐरोली (नवी मुंबई) येथून आणखी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली असून दोन हजारांच्या १२३ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

याप्रकरणी सूरज ऊर्फ मनिष मल्ला ठाकुरी (वय ३४, घनसोली, नवी मुंबई), जिलानी आशपाक शेख (वय ४७, रा. ऐरोली, नवी मुंबई) अशी शुक्रवारी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. २३ रोजी बसस्थानकजवळील एका दुकानात खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर या संशय्तिांनी तिथे दोन हजाराची बनावट नोट दिली. रात्री पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य तिघे पसार झाले होते. त्यानंतर प्रेमविष्णू राफा आणि नरेंद्र ठाकूर यांना कल्याण येथून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून दोन हजारांच्या २९ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. शिवाय दोन मोबाईलही जप्त करण्यात आले होते.  

सुरुवातील अटक केलेल्या राज सिंह याच्याकडील चौकशीनंतर प्रेमविष्णू राफा, नरेंद्र ठाकूर यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुरुवारी पोलिसांचे पथक कल्याणला गेले होते. तेथे चौकशी केल्यानंतर ऐरोलीतून सूरज ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक अशोक विरकर, सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस हवालदार बिरोबा नरळे, नाईक सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांनी कारवाई केली. 

रखेलीच्या माध्यमातून तस्करांशी संपर्क

मूळच्या पश्‍चिम बंगालच्या असलेल्या एका महिलेशी प्रेमविष्णू राफा याचे अनैतिक संबंध आहेत. त्यातून त्याचे पश्‍चिम बंगालला जाणे-येणे होते. त्यातूनच त्याला बनावट नोटांची तस्करी करणार्‍या जिलानीशी ओळख झाली होती. त्यातूनच त्याने लाखो रूपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या आहेत.

आतापर्यंत आठ मोबाईल जप्त

यापूर्वी अटक केलेल्या राज सिंह, प्रेमविष्णू राफा, नरेंद्र ठाकूर यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते. शुक्रवारी अटक केलेल्या जिलानी शेख, सूरज ठाकुरी यांच्याकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ मोबाईल जप्त केले आहेत. 

इंटरनेटद्वारे शहरांची निवड

दरम्यान पश्‍चिम बंगालमधून आणलेल्या बनावट नोटा खपवण्यासाठी इंटरनेटवरून शहरांचा शोध घेतला जात होता. हा शोध प्रेमविष्णू राफा स्वतः घेत होता. त्यानंतर नोटा खपवण्यासाठी संबंधितांना त्या शहरात पाठवण्यात येत होते. 

तीनशे रूपयांसाठी खपवत होते नोटा

दरम्यान राफाकडे राज सिंह, नरेंद्र ठाकूर याच्यासारखे अनेकजण नोटा खपवणार्‍यांची टोळी आहे. गरीब परिस्थितील युवक शोधून त्यांना नोटा खपवण्याचे काम देण्यात येत होते. दोन हजार रूपयांची एक बनावट नोट खपवल्यानंतर त्या युवकांना त्यातील तीनशे रूपये कमीशन म्हणून देत होता. केवळ तीनशे रूपयांसाठी सिंह, ठाकूरसारखे अनेकजण त्याच्याकडे नोटा खपवण्याचे काम करत होते. 

जिलानी पूर्वीपासून बनावट नोटांच्या तस्करीत

यातील मुख्य संशयित जिलानी शेख हा पूर्वीपासून बनावट नोटांच्या तस्करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर नाशीकमध्ये बनावट नोटांप्रकरणीच पूर्वीच एक गुन्हा दाखल आहे. पूर्वी चलनात असलेल्या एक हजार आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटांचीही तो तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. 

राफाचे तीन बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड जप्त

यातील संशयित प्रेमविष्णू राफा हा मूळचा मेघालय मधील आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. त्याची उत्तरप्रदेशातील असून वडील मेघालयचे आहेत.

दरम्यान त्याच्याकडे तीन बनावट आधार कार्ड सापडली असून त्यावर नाव एकच आहे मात्र जन्मतारीख आणि पत्ता मात्र कल्याण, नवी मुंबई आणि पश्‍चिम बंगालचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय त्याच्याकडे दोन पॅनकार्ड सापडली असून तीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्याच्याकडे विविध बँकांची एटीएम, डेबिट कार्डही सापडली असून त्याद्वारेच तो बनावट नोटांसाठी व्यवहार करत होता. 

कल्याणपर्यंत अशा येत होत्या बनावट नोटा...

यातील मुख्य संशयित प्रेमविष्णू राफा हा पश्‍चिम बंगालमधील एकाच्या खात्यावर दहा हजार रूपये जमा करत होता. पैसे जमा झाल्यानंतर त्याला काही दिवसातच कल्याणमध्ये एक लाख रूपयांच्या बनावट नोटा मिळत होत्या. त्यानंतर तो राज सिंह, नरेंद्र ठाकूर यांसारख्या अनेकांमार्फत तो बाजारात चलनात आणत होता. त्यातील सर्व नोटा खपवल्यानंतर तो चाळीस हजार रूपये पुन्हा पश्‍चिम बंगालमधील व्यक्तीच्या खात्यावर भरत होता. तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच पुढील व्यवहार केला जात होता. पश्‍चिम बंगालमधील त्या व्यक्तीच्या शोधासाठीच पोलिसांचे पथक लवकरच जाणार आहे. 

राफाने आतापर्यंत बारा लाख भरले...
पश्‍चिम बंगालमधील प्रमुख सूत्रधाराच्या खात्यावर पैसे भरल्यानंतरच कल्याणमध्ये बनावट नोटा पोहोच केल्या जात होत्या. राफाकडे सापडलेल्या विविध एटीएम कार्डवरून त्याने आतापर्यंत बारा लाख रूपये पश्‍चिम बंगालमधील खात्यावर भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत २४ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय मनिष ठाकुरी, जिलानी शेख यांनी किती रूपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्या आहेत याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बनावट नोटांचे बांग्लादेश कनेक्शन...

यातील संशयित प्रेमविष्णू राफा, नरेंद्र ठाकूर, मनीष यांच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक रविवारी कल्याणला गेले होते. त्यावेळी राफा रखेलीसोबत विजापूर येथे गेल्याचे पथकाला समजल्यानंतर पथकाने विजापुरात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान राफाची रखेल ही मूळची पश्‍चिम बंगालची आहे. तिच्या माध्यमातूनच ओळख झालेल्या जिलानीकडून राफा बनावट नोटा आणत असल्याचा संशय पोलिसांना आहे.  शिवाय बांग्लादेशमधून या नोटा येत असल्याचाही संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. यातील नोटा पुरवणार्‍या तसेच त्या तयार करणार्‍यांच्या शोधासाठी आता पोलिसांचे पथक पश्‍चिम बंगालला लवकरच जाणार असल्याचे सांगण्यात आले.