Tue, Apr 23, 2019 18:06होमपेज › Sangli › बारा गावांची तपासणी पूर्ण; पाच गुणांसाठी सरसावले

बारा गावांची तपासणी पूर्ण; पाच गुणांसाठी सरसावले

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:04PMसांगली : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 अंतर्गत केंद्र शासनाच्या पथकाने जिल्ह्यात सार्वजनिक स्वच्छता सर्वेक्षणासाठी निवडलेल्या 13 पैकी 12 गावात सर्वेक्षण झाले आहे. उर्वरीत लोहगावचे सर्वेक्षण मंगळवारी होणार आहे. स्वच्छ जिल्हा मुल्यांकनात सांगली जिल्हा देशात चमकेल, अशी आशा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केली. 

देशात सर्व जिल्ह्यांचे स्वच्छताविषयक  गुणांकन ठरविण्यासाठी ‘स्वच्छ  सर्वेक्षण  ग्रामीण 2018’अंतर्गत दि. 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सर्वेक्षण होत आहे.  सांगली जिल्ह्यातील सर्वेक्षण मंगळवारी (दि. 14 ऑगस्ट) पूर्ण होत आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, मंदिरे, यात्रास्थळे तसेच ग्रामपंचायतअंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे यांची पाहणी केली जात आहे. 

13 गावांवरून जिल्ह्यांचे मुल्यांकन

सांगली जिल्ह्यातील कांचनपूर, कळंबी, एरंडोली (ता.मिरज), मोराळे पेड (ता. तासगाव), रामापूर (ता. कडेगाव), भटवाडी, हातेगाव, खिरवडे (ता. शिराळा), पात्रेवाडी (ता. आटपाडी), ताडाचीवाडी, खंबाळे, पळशी (ता. खानापूर) या 12 गावांचे सर्वेक्षण केंद्र शासनातर्फे जनता पब्लिक रिसर्च सेंटर पुणे यांच्या पथकाने केले आहे. लोहगावचे सर्वेक्षण मंगळवारी होणार आहे. या 13 गावांच्या मुल्यांकनावरून जिल्ह्याचे मुल्यांकन निश्‍चित केले जाणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत निवडलेल्या गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणची निरिक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्राम पंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेबाबतीत समज आणि मते घेतली आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेत स्थळावरील माहितीचा आधारही घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दीपाली पाटील यांनी दिली.

सर्वेक्षण केलेल्या गावात सार्वजनिक स्वच्छतेसाठी 30 गुण, नागरिक व मुख्य व्यक्तींची स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय यांना 35 गुण, स्वच्छताविषयक सद्यस्थितीला 35 गुण आहेत. नागरिक तसेच मुख्य व्यक्तीचीं स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय याअंतर्गत नागरिकांचे ऑनलाईन अभिप्राय घेतले जात आहेत. त्यासाठी 5 गुण आहेत. या 5 गुणांसाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय देण्यासाठी जिल्हा परिषदेने फिल्डींग लावली आहे. दि. 31 ऑगस्टपर्यंत अभिप्राय नोंदवायचे आहेत.