Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Sangli › बारा उमेदवार अशिक्षित, 52पाचवी शिकलेले 

बारा उमेदवार अशिक्षित, 52पाचवी शिकलेले 

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 10:46PMसांगली : शिवाजी कांबळे 

महापालिका निवडणुकीसाठी  डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट यासारख्या उच्चशिक्षितांनी अर्जच भरलेला नाही. तर 12 अशिक्षित उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. तब्बल 52 उमेदवार पाचवीपर्यंत शिकलेले आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारांची कुंडली चौका-चौकात प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये धक्कादायक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. या यादीप्रमाणे समाजातील शिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी उमेदवारीसाठी अर्जच भरला नसल्याचे दिसून येते.

या निवडणुकीसाठी पाच वकील निवडणूक रिंगणात आहेत. मात्र अन्य उच्चशिक्षित लोकांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेतून  पैसा व पैशातून सत्ता असे दृष्टचक्र सुरू असल्याचे दिसते. ज्याच्याकडे भरपूर पैसा व गुंडांचे पाठबळ असेच  निवडून येतात, असा समज समाजात असल्याने चांगले, अनुभवी, नि:स्वार्थी व समाजकार्याची आवड असणारे लोक निवडणुकीत उभे राहण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

निवडून येण्याची खात्री नसल्याने चांगले, सुशिक्षित लोक निवडणूक लढवत नाहीत. त्याला महत्वाचे कारण म्हणजे ‘हे आपले काम नाही’, असे उच्चशिक्षितांचे मत आहे. निवडणूक लढवून जिंकून येण्यासाठी ज्या चांगल्या- वाईट क्‍लुप्त्या कराव्या लागतात. त्या करण्याची तयारी या लोकांकडे नसते. याचा गैरफायदा घेऊन  अनेक अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडून येतात व विकास कामांपेक्षा टक्केवारीचीच कामे होतात. 

हे चित्र बदलण्यासाठी  सुशिक्षित व समाजातील नामांकित, नि:स्वार्थी, व समाजकार्याची आवड असणार्‍या लोकांनी निवडणुकीसाठी उभे राहिले पाहिजे व प्रभागाचा विकास साधला पाहिजे तरच हे चित्र बदललेले दिसेल. दुर्दैवाने महापालिका निवडणुकीसाठी  12 अशिक्षित  आणि पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले 52 जण उभे आहेत. यावरून लक्षात येते की, निवडणुकीसाठी अल्पशिक्षित व अशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक आहे.

शिक्षित, अशिक्षित उमेदवारांची संख्या

अशिक्षित उमेदवारांची संख्या                     :    12
पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या   :   52
10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या  : 175
12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या  : 59
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या    : 132

गुन्हे दाखल असणारे 41 जण निवडणूक रिंगणात

या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या  41 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 1 ते 12 गुन्हे दाखल असणारे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एरवी एक-दोन गुन्हे दाखल असणार्‍यांवर हद्दपार व मोक्का कायद्यानुसार कारवाई केली जाते. मग 12 गुन्हे दाखल असणार्‍या व्हाईट कॉलर लोकांवर अद्याप का कारवाई झाली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारांची कुंडली जाहीर केली. अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरच ही कुंडली प्रसिध्द केली असली तर सर्व मतदारांना त्याची माहिती लवकर मिळाली असती.

निवडणुकीत 90 कोट्याधीश उमेदवार

या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 90 कोट्यधीश उमेदवार उभे आहेत. सर्वाधिक श्रीमंत  एक उमेदवार आहेत. त्यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 17 लाख आहे. तर स्थावर मिळकत 9 कोटी 33 लाख इतकी आहे. सर्वांत गरीब उमेदवार  एकजण आहेत. त्यांची जंगम मालमत्ता 3 हजार रुपये  एवढीच असून स्थावर मिळकत काही नाही.