Fri, Jul 19, 2019 18:05होमपेज › Sangli › हळद व्यापारी तोट्यात; ११ कोटी अडकले

हळद व्यापारी तोट्यात; ११ कोटी अडकले

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

हळदीच्या निर्यातीत तोटा झाल्याने सांगली मार्केट यार्डमधील एक व्यापारी गोत्यात आला आहे. मार्केट यार्डातील पंधरा ते वीस अडत्यांचे सुमारे 11 कोटी रुपये या खरेदीदार व्यापार्‍याकडे अडकले आहेत. त्यामुळे अडत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वर्षभरातील हा दुसरा झटका आहे. 

सांगली मार्केट यार्डातील एका खरेदीदार व्यापार्‍याने मुंबईतील निर्यातदाराला हळद विकली होती. ही हळद दुबईला निर्यात झाल्याचे समजते. दरम्यान या हळद व्यापारात तोटा झाल्याने संबंधित खरेदीदार व्यापारी आणि अडते अडचणीत आले आहेत. सुमारे 15 ते 20 अडत्यांचे 11 कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम आता कशी वसुल होणार या विवंचनेत अडते आहेत. अडत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मार्केट यार्डातील अडत्यांना वर्षभरातील हा दुसरा झटका आहे. यापूर्वी एका खरेदीदार व्यापार्‍याकडे 70 लाख रुपये अडकले होते. संबंधित खरेदीदार व्यापार्‍याने अडत्यांची 70 टक्के रक्कम परत केली आहे. ही रक्कम 50 लाख रुपये आहे. अद्याप 20 लाख रुपये वसूल व्हायचे आहे. संंबंधित खरेदीदार व्यापार्‍याचे सांगली मार्केट यार्डात दुकान असल्याकडेही काही अडत्यांनी लक्ष वेधत बाजार समितीने वसुलीची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. 

सांगली मार्केट यार्ड ही हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. हळदीची वार्षिक सुमारे 1200 कोटी रुपयांची उलाढाल होते. दरम्यान व्यापारातील चढ-उताराचे काही झटकेही व्यापारी, अडत्यांना बसत आहेत. 

 

Tags : sangli, sangli news, Turmeric trade losses, stuck,