Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Sangli › तूर खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकर्‍यांना मनस्ताप

तूर खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकर्‍यांना मनस्ताप

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:17PMसांगली ः प्रतिनिधी

नाफेडमार्फत सांगली मार्केट यार्डात सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला. हेक्टरी 5 क्विंटलऐवजी 3.5 क्विंटल तूर खरेदीचा निकष लावल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. साडेतीन क्विंटलवरील तूर परत न्यावी लागली. 

तुरीला क्विंटलला 5 हजार 450 रुपये हमीभाव आहे. मात्र बाजारात 3 हजार 500 ते 4 हजार 100 रुपये दर आहे. बाजारात तुरीचे भाव घसरल्याने शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा फेडरेशन अधिकारी रावसाहेब दानोळे, सेंट्रल वेअर हाऊसचे अधिकारी श्री. शेंडगे, बाजार समितीचे सांख्यिकी विभागप्रमुख तानाजी पाटील व शेतकरी उपस्थित होते. 

सहाशे शेतकर्‍यांची नोंदणी

हमीभावाने तूर खरेदीसाठी सहाशेहून अधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. शुक्रवारी तूर खरेदीस सुरूवात झाली. सुमारे 20 शेतकर्‍यांना तूर घेऊन येण्यास सांगितले होते. दरदिवशी सुमारे वीस शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे खरेदी केंद्रावर बोलावून तूर खरेदी केली जाणार आहे. 

नोंदणीवेळी हेक्टरी 5 क्विंटल तूर खरेदी केली जाणार असल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात आले होते. मात्र पीक कापणी प्रयोग अहवालानुसार सांगली जिल्ह्यात हेक्टरी 3.50 क्विंटल तूर खरेदी करण्याबाबत शासनाचे पत्र आले आहे.  त्यामुळे काही शेतकर्‍यांना साडेतीन क्विंटलवरील तूर परत न्यावी लागली. शेतकर्‍यांना मनस्ताप झाला. अपरिपक्वतेअभावी दोन शेतकर्‍यांची तूर खरेदी केली नाही. शुक्रवारी पहिल्या दिवशी 150 क्विंटल तूर 5 हजार 450 रुपये हमीभावाने खरेदी केली.

सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले, हेक्टरी 3.5 क्विंटल तूर खरेदीचा निकष अन्यायी आहे. हा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी कृषी व पणमंत्री यांची भेट घेणार आहोत.