Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Sangli › महसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न

महसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:02AM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

ढवळी (ता. तासगाव) येथे नदीपात्रात चोरटा वाळू उपसा करणार्‍यांना अडवण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी मंडल अधिकारी चंद्रकांत ओंबासे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रदीप रघुनाथ चव्हाण (रा. ढवळी) याच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाने वाळूतस्करी विरोधात तालुक्यात कारवाई सुरू आहे. गुरुवारी  ओंबासे हे तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांसह येरळा नदीपात्रात गस्त घालत होते. त्यावेळी ढवळी-तुरची पुलाच्या उत्तरेस प्रदीप चव्हाण  नंबरप्लेट नसलेल्या वाहनातून वाळू तस्करी वाहतूक करीत होता. 

महसूलचे अधिकारी त्याला पकडण्यास गेले असता त्याने ओंबासे आणि अन्य अधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर  तो पळून गेला. त्याने 12 हजार रुपये किमतीच्या 1 ब्रास वाळूचे उत्खनन केल्याने त्याच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.