Fri, Jun 05, 2020 01:15होमपेज › Sangli › सत्तेसाठी संविधान बदलण्याचा प्रयत्न

सत्तेसाठी संविधान बदलण्याचा प्रयत्न

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMविटा : प्रतिनिधी  

जाती, धर्मामध्ये भांडणे लावून आपला राजकीय हेतू साध्य करून घेण्यासाठी संविधान बदल्याचे प्रयत्न मोदी सरकार करीत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉ. सीताराम येचुरी यांनी केला. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली.

येथील क्रांतीसिंह लोक विद्यापीठाच्यावतीने कॉ. येचुरी यांना यंदाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी कॉ. येचुरी बोलत होते. (व्यासपीठावर) कॉ. अशोक ढवळे, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील, डॉ. बाबुराव गुरव  उपस्थित होते. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी  प्रास्ताविक केले.

कॉ. येचुरी म्हणाले, सिनेमावालेे तीन तास मनोरंजन करून प्रेक्षकाला विचार करायची संधी देत नाहीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील हुबेहूब असेच फिल्ममेकर आहेत. प्रत्येक दिवशी ते नवी  घोषणा करतात.  मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, स्टेप उप इंडिया अशा घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र  जनतेची फसवणूक केली जात आहे. 

ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा करीत आहे.  त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरकारी नोकर्‍याच नाहीत; तर आरक्षण का मागता असे विचारत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे नोकरी व रोजगार हवा असेल तर पकोडे तयार करा अथवा पानटपरी लावा, अशी तरुणांची खिल्ली उडवत आहेत.

ते म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या स्वातंत्र्यसेनानींच्या लढ्यामुळे ब्रिटीश या देशातून निघून गेले. देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा हेतू हा संविधानात स्पष्ट केला आहे. आज  नेमके ते संविधान  बदलण्याचा  प्रयत्न सुरू आहे. अशावेळी संविधानाला वाचविण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या सर्वांना एकत्रितपणे करावे लागणार आहे. 

येचुरी म्हणाले,  आज  काय म्हणायचे अथवा कशाचा जयघोष करायचा याचीही जबरदस्ती केली जात आहे. देशातील वेगवेगळ्या जातीधर्मांना भारतीय हा एकच शब्द एकत्र  जोडतो. त्यामुळे धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रकार कुणी करू नये.

डॉ.  साळुंखे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या शेतकर्‍यांची भाषा समजणार्‍या रांगड्या व्यक्तिमत्वाच्या नावाने येचुरी यांना दिला जाणारा पुरस्कार हा चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. भाई सुभाष पवार, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, अ‍ॅड. नानासाहेब पाटील, प्रा. पांडुरंग शितोळे, अ‍ॅड. स्वाती पाटील, युवानेते इंद्रजीत पाटील, प्रा. स्नेहल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.