Sat, Jun 06, 2020 09:44होमपेज › Sangli › वाहतूकदारांचा चक्‍काजाम; लाखो रुपयांचा फटका

वाहतूकदारांचा चक्‍काजाम; लाखो रुपयांचा फटका

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी 

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या वतीने देशव्यापी चक्‍काजाम आंदोलन सुरू आहे. त्यामुळे  सांगलीसह जिल्ह्यातील ट्रक, टेम्पोसह विविध वाहनांची चाके दुसर्‍या दिवशीही थांबली. याचा वाहतूक व्यवसायासह सर्व बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला. लाखो रुपयांची  उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय, शहरातील हजारांवर ट्रकची दैनंदिन आवक-जावक  बंद झाली आहे.

यासंदर्भात सांगली जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेकवेळा असोसिएशनने पाठपुरावा केला. परंतु निणय झालेला नाही. अगदी 20 जुलैची डेडलाईन देऊनही सरकारला जाग यायला तयार नाही. यामुळे देशभर सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत जिल्ह्यातही वाहतूकदार संघटनांनी बंद आंदोलन पुकारले आहे.

ते म्हणाले, यामुळे जिल्ह्यातील सुमारे 500 हून अधिक ट्रक जागेवर थांबून आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात अन्य शहर, राज्यातून विविध प्रकारची वाहतूक आवक न होता थांबली आहे. जिल्ह्यातून विविध प्रकारचे धान्य, साखरेसह विविध प्रकारच्या वस्तूंची अन्य जिल्हा, राज्यात पाठविली जाते. शिवाय जिल्ह्यातही अन्य राज्यातून खाद्यपदार्थ, धान्य, जीवनावश्यक विविध वस्तूंची आवक केली जाते. ती वाहतूकही थांबली आहे. विशेषत: मिरज जंक्शन असल्याने येथून विविध प्रकारची आवक-जावक होते ती सुद्धा ट्रकच्या वाहतुकीमुळे ठप्प झाली आहे.

कलशेट्टी म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये पूर्वी साठा होता त्यामुळे दोन दिवस विशेष परिणाम जाणवला नाही. तरीही दैनंदिन आवक -जावक मात्र ठप्प झाल्याने 100 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. सुमारे हजारांवर ट्रक, टेम्पोसह विविध वाहनांचीही सुमारे 50 लाखांहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. शासनाकडून मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.