Fri, Nov 16, 2018 22:03होमपेज › Sangli › वाहतूक पोलिस केवळ वसुलीसाठी आहेत काय?

वाहतूक पोलिस केवळ वसुलीसाठी आहेत काय?

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:10PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात वाहतूक नियंत्रक पोलिसांचे व्यवस्थित नियोजन नाही. नागरिकांचे हाल सुरू आहेत. वाहतूक पोलिस केवळ वसुलीसाठीच आहेत काय, असा सवाल सर्व पक्षीय कृती समिती आणि मिरज येथील नागरिकांनी केला. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी गुरुवारी वाहतुकीसंदर्भात बैठक आयोजित केली होती. महापालिकेचे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर, कृती समितीचे सतीश साखळकर, महेश खराडे, उमेश देशमुख, अमर पडळकर, आशिष कोरी, आसिफ बावा, तानाजी रुईकर, उत्तम कांबळे, नितीन चव्हाण, महेश पाटील, विलास देसाई, पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेचे प्रमुख अतुल निकम आदी उपस्थित होते. 

शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सिग्नल आहेत. ते दुरुस्त करावेत. राजवाडा चौकात वाहतुकीची कोंडी होत असतानाही वाहतूक पोलिसांच्या समोरच वडाप-रिक्षा प्रवासी भरत असतात. एकेरी वाहतुकीच्या ठिकाणी पोलिस केवळ पावत्या फाडण्यासाठी थांबून असतात. उपनगरात वाहतूक पोलिसांची गरज नसतानाही वाहनधारकांना अडवून त्यांची तपासणी केली जाते आदी तक्रारी समितीच्या सदस्यांनी मांडल्या. 

मिरजेतील प्रतिनिधींनी उपस्थित केलेले मुद्दे असे : मिरज शहरात  एकही सिग्नल सुरू नाही. पार्किंगची व्यवस्था नाही.  वाहतूक पोलिस केवळ बेकायदा वसूल करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.   वरिष्ठ पोलिस अधिकारी आम्ही केलेल्या तक्रारींची   दखल घेत नाहीत. या प्रश्‍नाकडे नेत्यांचे लक्ष नाही. 

म्हैसाळकडून मिरज शहरात प्रवेश करताना कर्नाटकातील  गाडी मुद्दाम अडवून त्यांच्याकडून वसुली केली जाते. त्याची कर्नाटकात चर्चा सुरू आहे. परिणामी कर्नाटकातील पोलिस ही महाराष्ट्रातल्या वाहनधारकांना त्रास देतात. एकट्या मिरज शहरात 55 वाहतूक पोलिसांची गरज आहे का? आदी मुद्दे मिरज शहरातील प्रतिनिधींनी  उपस्थित करीत मिरजेला पाकिस्तान न समजता सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचीही दखल घेण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.