Fri, Apr 26, 2019 15:43होमपेज › Sangli › उद्योजकाच्या अपहरणाचा प्रयत्न

उद्योजकाच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 11:37PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

येथील उद्योजक वैभव शामराव यादव (वय 37, रा. राजेबागेश्‍वर, इस्लामपूर) यांना रिव्हॉल्व्हर आणि कोयत्याचा धाक दाखवत चौघा अज्ञातांनी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतील कामगार व नागरिक जमा झाल्याने अपहरणकर्त्यांनी पळ काढला. हा प्रकार रविवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडला. 

 यादव यांची एमआयडीसीत ‘ग्लास इन्स्ट्रुमेंटस्’ नावाची कंपनी आहे. कंपनीत 20 कर्मचारी  आहेत. रविवारी सायंकाळी कंपनीचा अकौटंट प्रशांत पडळकर व यादव हे ऑफिसमध्ये चर्चा करीत बसले होते. दरम्यान, 6.30 च्या सुमारास 35 ते 40 वयोगटातील चार अज्ञात व्यक्‍ती ऑफिसमध्ये आल्या. ‘तुम्ही यादव साहेब का?’, अशी विचारणा त्यातील एकाने केली. 

‘होय’, असे यादव म्हणाले. ‘तुम्ही आमच्या नात्यातील महिलेला फोन का करता,’ अशी विचारणा करत त्या चौघांनी यादव यांच्याशी वाद घातला. 
‘तुमचा काय तरी गैरसमज होतोय, मी कोणत्याही महिलेला फोन केला नाही’, असे यादव युवकांना सांगत होते. यातूनच वादावादी वाढत गेली. तिथे असणार्‍या पडळकर यांनी यादव यांची बाजू घेतली. अज्ञात व्यक्‍तींपैकी एकाने यादव यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावले. एकाने कोयत्याचा धाक दाखविला.

यादव यांना जबरदस्तीने कंपनी परिसरात लावलेल्या गाडीत बसविण्यासाठी ते नेऊ लागले. यादव यांनी प्रतिकार करीत आरडाओरडा केला. त्यावेळी कंपनीतील कामगार, नागरिक धावून आले. लोक जमा होताच अपहरणकर्त्यांनी कार घेऊन पळ काढला. यादव यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
सहायक पोलिस निरीक्षक संंग्राम शेवाळे तपास करीत आहेत. 
Tags : Traders kidnap ,business ,sangli news