Wed, Jul 17, 2019 18:54होमपेज › Sangli › व्यापारी अपहरण प्रकरण; संशयिताच्या कोठडीत वाढ

व्यापारी अपहरण प्रकरण; संशयिताच्या कोठडीत वाढ

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील तांदूळ व्यापारी आबीद शिवानी यांचे अपहरण केल्याप्रकरणी अटकेतील मोहम्मद हशीम शहाबुद्दीन (वय 22, रा. रूपडागा, जि. पलवल, हरियाणा) याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याला दि. 15 रोजी हरियाणातून सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, यातील अन्य तिघे संशयित फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक हरियाणाला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.  

मोहम्मदसह त्याच्या साथीदारांनी दि. 10 रोजी शिवानी यांच्याशी संपर्क साधला होता. व्यापाराविषयी बोलणे करायचे असल्याचे सांगून त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. त्यानंतर शिवानी दिल्लीत पोहोचल्यानंतर मोहम्मदसह चौघा संशयितांनी त्यांना एका कारमधून नेले. त्यानंतर काही वेळाने संशयितांपैकी एकाने शिवानी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला. 

शिवानी यांचे अपहरण केले असून 12 लाख रूपये देण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर तीन लाख रूपयांवर सौदा ठरला. शिवानी यांच्या घरच्यांनी कॅनरा बँकेत संशयिताच्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर शिवानी यांची सुटका करण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. 

दरम्यान, शहाबुद्दीन याने चौकशी दरम्यान हरियाणातील तिघांची नावे सांगितली आहेत. अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आता एक पथक त्या तिघांच्या अटकेसाठी हरियाणाला पाठविण्यात येणार आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे निरीक्षक शेळके यांनी सांगितले.