Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Sangli › बोरगावचा नदीकाठ पर्यटनस्थळ होतोय!

बोरगावचा नदीकाठ पर्यटनस्थळ होतोय!

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 05 2018 8:48PMबोरगाव : विजय शिंदे

वाळवा तालुक्यातील बोरगावला नैसर्गिक नदीकाठ लाभला आहे. त्या ठिकाणी असणारा बंधारा, नदीकाठची प्राचीन मंदिरे, परिसरात झालेले वृक्षारोपण तेथील हिरवाई, निसर्गरम्य परिसर यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.

बारमाही दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी यामुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. या  गावाला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे.  गाव वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. आता नवनवीन विकासाच्या संकल्पना सत्यात उतरून जणू बोरगाव गावचा चेहरामोहराच बदलू लागला आहे.

जोतिबा मंदिर...

नदीकाठी असणार्‍या प्राचीन जोतिबा मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरासमोरच भव्य सभा मंडप आहे. 20 गुंठ्यापेक्षा जास्त असणार्‍या मंदिर परिसरात ग्रामपंचायतीने लॉन, वृक्षारोपण, प्रदक्षिणा मार्गावर पेव्हिंग ब्लॉक, ग्रील बसविल्यामुळे हा परिसर भाविक, वयोवृद्ध, बालगोपाळांच्या विरुंगळ्याचे ठिकाण बनले आहे. सकाळी, सायंकाळी या ठिकाणी मोठी गर्दी असते.

राजारामबापू उद्यान...

नदीकाठी असणार्‍या राजारामबापू उद्यानावर वर्षानुवर्षे होत असलेली वृक्ष लागवडीने वृक्षांची दाटी  झाली आहे. उद्यानात   वॉकींग ट्रॅक बांधण्यात आला आहे. भविष्यात त्याच्या रुंदीत वाढ करण्यात येणार असून नागरिक व्यायामासाठी याचा वापर करीत आहेत. उद्यानाच्या मध्यभागी असणारे प्राचीन गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

ब्रम्हानंद मठ...

गावाच्या पश्‍चिम बाजूला प्राचीन ब्रम्हानंद महाराज मठ असून मठासमोर भव्य सभा मंडप आहे. या ठिकाणी ग्रंथ वाचन, प्रवचन, कीर्तन, पारायण सोहळा, दत्त जयंती अशा  अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्या परिसरातील नदीकाठालगत ग्रामपंचायतीच्यावतीने पाथदिवे बसविले जाणार आहेत. दोन्ही बाजूस नारळ, सुपारी झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. 

कलंकी केशव मंदिर...

उत्तरवाहिनी नदीकाठी असलेले कलंकीकेशव मंदिर परिसर वृक्षारोपणामुळे पर्यटकांसाठी मोहिनी ठरत आहे. मंदिरासमोरच साडेआठ कोटी रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला आहे.  बंधार्‍यालगतच गावच्या बाजूस असलेले संरक्षण कठडे व त्यावर पर्यटकांसाठी सिमेंटची बाकडी टाकण्यात आली आहेत. त्या बाकावर बसून समोर संत वाहणारी कृष्णामाई, नदीकाठाची घनदाट वनराई यामुळे पर्यटकांचे मन प्रसन्नच होत आहे. 

हरित बोरगाव अभियान...

बोरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हरित बोरगाव अभियानातून गेल्या 5 ते 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. गर्द वनराईमुळे हा पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे.