Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Sangli › उमेदवारी छाननीसाठी भाजपचा आज मेळावा

उमेदवारी छाननीसाठी भाजपचा आज मेळावा

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीची व्यूहरचना आणि भाजप उमेदवारांची छाननी करण्यासाठी शनिवारी  येथे मेळावा होत आहे. येथील कच्छी भवनमध्ये  दुपारी 12 वाजता या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. श्री. पाटील, देशमुख यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी प्रभागनिहाय इच्छुकांची माहिती घेऊन त्यांच्याशी चर्चा  करून यादी ठरविणार आहेत.  

महापालिका निवडणुकीत भाजप सत्ता मिळविणारच, असा निर्धार चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केला आहे. त्यानुसार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाजपने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली आहे. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

काँगे्रस-राष्ट्रवादीच्या मनपातील गैरकारभाराविरोधात समविचारी पक्षांना एकत्र करण्याचाही निर्धार भाजप नेत्यांनी व्यक्‍त केला आहे.  रिपब्लिकन पक्षासोबत युतीचा निर्णय झाला आहे. अन्य पक्षांनाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतूनही अनेक आजी-माजी नगरसेवकांसह प्रबळ इच्छुक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडे आले आहेत. आणखी 30-35 आजी-माजी नगरसेवक भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा ना. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी यापूर्वी केला आहे.

दरम्यान प्रभागनिहाय भाजपच्या निष्ठावंत उमेदवारांनी उमेदवारीसाठी शक्‍तिप्रदर्शन करून निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली होती.आता या सर्वच इच्छुकांचा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पाटील, देशमुख यांच्यासह कोअर कमिटीचे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांची मते जाणून घेण्यात येतील. शिवाय भाजपने स्वतंत्रपणे गोपनीय सर्व्हेक्षणही केले आहे. यातून इच्छुकांची प्रभागनिहाय यादी ठरविण्यात येणार आहे.  परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आघाडी झाली तरी किंवा न झाली तरी उमेदवारी न मिळालेले इच्छुक भाजपच्या गळाला लागतील, असा विश्‍वास भाजप नेत्यांना आहे. त्यावरही भाजपचा वॉच आहे. अशा  ताकदवान इच्छुकांना अगदी शेवटच्या क्षणीही पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देऊ, असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले होते. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांना लवचिकता ठेवावीच लागते, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची दोन दिवसांत आघाडी होते की नाही? झाली आणि न झाली तरी कोण-कोण भाजपच्या गळाला लागते याबाबतही कोअर कमिटीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत.  निवडणुकीसाठीची सर्व प्रकारची व्यूहरचना करण्याबाबतही  चर्चा होईल. त्यानंतर  उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष  आहे.

भाजपच्या छुप्या बैठका सुरूच

काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीबाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवले आहे. त्यातून भाजपच्या हाती नाराज उमेदवार लागू नयेत अशीही खबरदारी घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. परंतु भाजपने निव्वळ आयातांवर भर न देता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास तोडीस तोड असणारे जनतेतून उमेदवार देण्याचीही तयारी सुरू ठेवली आहे. यासंदर्भात विविध संघटना, संघ, मंडळांच्या गोपनीय बैठकाही सुरू ठेवल्या आहेत.