Mon, Aug 19, 2019 13:21होमपेज › Sangli › शाळांची आज ‘पहिली घंटा’; बदल्यांचा घोळ संपेना

शाळांची आज ‘पहिली घंटा’; बदल्यांचा घोळ संपेना

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुक्रवारी पहिला दिवस आहे. उन्हाळा सुटीनंतर शाळांची ‘पहिली घंटा’  शुक्रवारी वाजणार आहेे. मात्र जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक बदल्यांचा घोळ अजून संपलेला नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी 159 शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणाअभावी बसून राहतील, तर बदलीमुळे ‘शून्य शिक्षकी’ झालेल्या 48 शाळांमध्ये शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. 

शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्यांचा प्रश्‍न संपेल, असे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले होते.  सचिवांनी तशा सूचना ‘एनआयसी’ला दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही शिक्षक बदल्यांवरून वादळी चर्चा झाली होती. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू होण्यापूर्वी बदल्यांचा प्रश्‍न सुटेल, असे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी  शासनाचा हवाला देत सांगितले होते. मात्र आज (शुक्रवार) शाळेचा पहिला दिवस आहे. तरी बदल्यांचा प्रश्‍न संपलेला नाही. 

जिल्हा परिषदेकडील 2 हजार 444 शिक्षकांच्या बदल्या तीन टप्प्यात झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील बदलीने जिल्ह्यात 86 शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या. दुसर्‍या टप्प्यानंतर ही संख्या 79 पर्यंत व आता तिसर्‍या टप्प्यानंतर ही संख्या 48 पर्यंत खाली आली आहे. चौथ्या टप्प्यात ही संख्या शून्यावर आणली जाणार होती. मात्र चौथ्या टप्प्यातील बदल्यांचा रँडम राऊंड दोन दिवसात झालेला नाही. त्यामुळे शून्य शिक्षकी 48 शाळांचा प्रश्‍न कायम राहिला आहे. मात्र ‘ग्रामविकास’ने या शाळांवर शिक्षकांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने नजिकच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची या 48 शाळांत तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यामुळे शुक्रवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांना  पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत होईल. 

विस्थापित 66 शिक्षकांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण मिळालेले नाही. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 93 शिक्षकांना जिल्हा बदलीचा प्रश्‍न संपल्यानंतर राज्यस्तरावरून नेमणुकीचे ठिकाण दिले जाणार आहे. त्यामुळे हे 159 शिक्षक बसून राहणार आहेत. समानीकरणाच्या पदावर बदली झालेले 54 शिक्षक समानीकरणातून कोणत्या शाळेत बदली होणार या विवंचनेत आहेत. बदल्यांच्या केंद्रीकरणाच्या शासनाच्या धोरणाचे पहिल्या वर्षीचे हे चित्र आहे. 

शून्य शिक्षकी शाळा, समानीकरणाचा प्रश्‍न जैसे थे

शिक्षक बदल्यांचे तीन टप्पे झाले आहेत. तालुकानिहाय शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणाचा प्रश्‍न कायम राहिला आहे. जत तालुक्यात तर बदल्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. समानीकरणासाठी जत तालुक्यात रिक्त पदे 85 आवश्यक आहेत. सध्या 139 पदे रिक्त आहेत. तिसर्‍या टप्प्यात अन्य तालुक्यातून केवळ 7 शिक्षक जत तालुक्यात आले आहेत. आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही समानीकरण झालेले नाही. समानीकरण व शून्य शिक्षकी शाळांवर शिक्षक नेमणुकीसाठी बदल्यांचे आणखी किती टप्पे होणार, याकडे लक्ष लागले आहे.