होमपेज › Sangli › बंडोबांच्या माघारीचा आज फैसला

बंडोबांच्या माघारीचा आज फैसला

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत  मंगळवारी संपत आहे. यामध्ये सर्वच पक्षीय उमेदवारांना  अडथळे असलेल्या बंडोबांना माघारीसाठी सोमवारी  दिवस-रात्र सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अक्षरश: जंग-जंग पछाडले. स्वीकृत, अन्य विविध प्रकारच्या कमिटमेंट देत नाराजांची मनधरणीही केली. यातून 67 जणांनी माघार घेतली. आता उर्वरित अपक्षांच्या माघारीचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत कोण-कोण माघार घेतात, त्यावर निवडणूक लढतीचे आणि मतांचे समीकरण स्पष्ट होणार आहे. 

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी आदी पक्ष मैदानात आहेत. यातून तब्बल 821 अर्ज दाखल होते. त्यापैकी 236 सर्वपक्षीय उमदेवार मैदानात आहेत. उर्वरित 485  अपक्षांचे अर्ज आहेत. सर्वच पक्षांतून निष्ठावंतांच्या नाराजीला आता अपक्ष महाआघाडीचे स्वरूप आले आहे. नगरसेवक राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी मोट बांधली आहे. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पाठबळ दिले आहे. यातून सर्वच सत्ताधारी पक्षांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

त्यासाठी ज्या-त्या पक्षांच्या नाराजांची गेल्या 12 जुलैपासून मनधरणी सुरू होती. त्याला खर्‍या अर्थाने आज गती आली. यामध्ये काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील  यांनी राजेश नाईक, अतुल माने यांच्यासह अनेक नाराजांना भेटून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांनी संपर्क साधला आहे. यामुळे अनेकांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल,असा दावा डॉ. विश्‍वजित कदम यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीच्या नाराजांचीही समजूत  काढण्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथून दूरध्वनीवरून  संपर्क साधला. प्रयत्न केले. यासाठी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील आदिनींही भेटी-गाठींवर भर दिला. पहिल्यांदाच ताकदीने लढणार्‍या भाजपलाही बंडोबांच्या  नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. भाजपच्या अपक्षांनी प्रत्येक प्रभागात अर्ज भरले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार आदींनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे आता यातून मंगळवारी कोण-कोण माघार घेणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

अनेकांनी ‘पुरस्कृत’ नाकारले; स्वीकृतचेही आमिष

बंडखोरांनी अनेक ठिकाणी पॅनेल करीत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे त्यांना काही पक्षांनी पुरस्कृत करण्याची आमिषे दाखविली.  परंतु, त्यांनी ते नाकारले. आता माघारीसाठी काहीजणांना स्वीकृत नगरसेवकासह विविध प्रकारची आमिषे दाखविली जात आहेत.