होमपेज › Sangli › ‘तंबाखूमुक्‍त’ शाळा कागदावरच!

‘तंबाखूमुक्‍त’ शाळा कागदावरच!

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:24PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये  ‘आपली शाळा तंबाखूमुक्त’ अभियान धुमधडाका जोरात सुरू आहे. बहुसंख्य शाळा आपली शाळा  तंबाखूमुक्त  दाखवण्यात व्यस्त असल्या तरी अनेक ठिकाणी हा उपक्रम केवळ कागदावरच राबविला जात असल्याचा जाणकार पालकांचा आरोप आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच केवळ कागदावर  शाळा तंबाखूमुक्त झाल्याचे दाखविणार्‍या बहाद्दरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आज अनेक शाळा आणि शाळा परिसरात तंबाखू बंदी फक्त नावापुरतीच राहिली आहे. काही शाळांमध्ये तरी  शिक्षकच शाळेच्या आवारात पान, तंबाखू, सुपारी, गुटखा खाऊन वर पल्लेदार पिचकारी मारताना दिसतात.  त्यामुळे तंबाखूमुक्ती अभियान फक्त कागदावरच काटेकोरपणे राबविण्याकडे यंत्रणा विशेष लक्ष देत असल्याचे चित्र आहे. पालकवर्गात यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

नियमांची अंमलबजावणी नाहीच...  

खरे तर वास्तविक शाळेमध्ये तंबाखू नियंत्रण कागदाची प्रत ठेवणे, शाळा परिसराच्या  100 मीटर परिसरात  तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थास खाण्यास व विक्री करण्यास बंदी आहे. शाळा प्रवेशद्वाराजवळ धुम्रपान बंदी असा मोठा फलक लावणे,   मुलांमध्ये वारंवार तंबाखू व्यसन मुक्तीसंबंधी जागृती करणे आदी विविध निकष बंधनकारक करुन त्यांच्या  अंमलबजावणीची सक्त सूचना  आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे.  केवळ  कागदी घोडे नाचवून आमची शाळा तंबाखूमुक्त आहे, हे दाखवून संबंधित विभागाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.